सुनंदा तिवारी यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार
आरोग्य सेवेतील महत्वाचा व सर्वात शेवटचा घटक असलेल्या ‘आशा’ स्वयंसेविकांचा पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. ‘आशा’ स्वयंसेविकांनी आरोग्यासोबतच स्वच्छतेचाही प्रसार, प्रचार करावा, असा सल्ला त्यांनी आशांना दिला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व कुटुंब कल्याण पारितोषिक समारंभ जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात झाला. त्यावेळी पालकमंत्री देवतळे बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सभापती अरुण निमजे, महिला व बालकल्याण सभापती अमृता सूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार, मोहितकर, बारलिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आठल्ये उपस्थित होते. आशा स्वयंसेविका म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या सुनंदा तिवारी यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला. ममता भिमटे व दर्शना मेश्राम यांना अनुक्रमे व्दितीय व तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या समारंभात आरोग्य सहायिका, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही पालकमंत्री देवतळे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा, नालंदा, तळोधी, लोंढोली व कोसरसार या केंद्रांचा पुरस्कार प्राप्त केंद्रांमध्ये समावेश आहे.
या जिल्ह्य़ात १७३२ आशासेविका कार्यरत असून, सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी त्यांच्यामार्फत घेतली जाते. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, ज्या प्रमाणात सुशिक्षित पिढी देशाचे नेतृत्व करते त्याचप्रमाणे सशक्त व सुदृढ पिढी देशाचे नेतृत्व करते. अशी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांची आहे. मुलगी वंशाचा दिवा असून, मुलगा-मुलगी, असा भेद करू नका, असेही आवाहन देवतळे यांनी केले. आशासेविकांच्या पुरस्काराचा कार्यक्रम आयोजनाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री देवतळे यांचे असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे यांनी दिली.
पुढील वर्षी या कार्यक्रमाचे स्वरूप भव्य राहणार असून, सर्व आशासेविकांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रास्ताविक डॉ.आठल्ये यांनी केले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्यााचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील आरोग्य सुविधांचा आढावा सादर केला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Oct 2013 रोजी प्रकाशित
चंद्रपूर जिल्ह्य़ातील ‘आशा’ स्वयंसेविकांचा सत्कार
सुनंदा तिवारी यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार आरोग्य सेवेतील महत्वाचा व सर्वात शेवटचा घटक असलेल्या ‘आशा’ स्वयंसेविकांचा पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
First published on: 02-10-2013 at 08:11 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honour to social worker in chandrapur