लातुरात संयुक्त पथकाचा हातोडा

शहरातील अतिक्रमणांची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने शिवाजी चौक ते पीव्हीआर टॉकीज समांतर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्यात आली.
रविवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी काही टपरीधारकांनी यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. टपरीधारक, भाजी विक्री करणारे यांचेही अतिक्रमण हटवण्यात आले. सायंकाळी शिवाजी चौकातील अतिक्रमणांना पथकाने हात घातला व ते हटवले. वर्षभरापूर्वी या मार्गावर अशीच मोहीम राबवली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू स्थिती पूर्वपदावर आली. ‘ये रे माझ्या मागल्या’ हा प्रकार होणे परवडणारे नसल्याचे संबंधित विभागाच्या लक्षात आले व त्यानंतर रविवारी पुन्हा ही मोहीम राबवण्यात आली.  आपल्यासारख्या छोटय़ा व्यावसायिकांना महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, आमचे हातावरचे पोट भागायचे कसे? असा सवाल छोटय़ा व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात होता. शहरात अनेक बांधकामे बेकायदा आहेत. त्यांना प्रशासन केव्हा हात घालणार, असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी उपस्थित केला.