तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने दरवर्षी जगात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. देशात प्रौढ व्यक्तींमध्ये तंबाखू खाणाऱ्यांचे व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण अधिक असून आता हे लोन लहान मुलांमध्येही पोहोचले आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणूक व विक्री करण्यावर राज्य शासनाने बंदी घातली असली तरी, योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा ‘फज्जा’ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अ‍ॅन्टबीन, अ‍ॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मक्र्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते. शासनाने तंबाखूच्या विरोधात अनेक कायदे केले असून त्याची अंमलबजावणी मात्र तंतोतंत होताना दिसत नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. कोवळी मने संस्कारक्षम असतात. मोठय़ांचे अवलोकन करून त्यांचे चांगले वाईट गुण विद्यार्थी अंगिकारतात. तेव्हा शिक्षकांनी तंबाखूच्या उच्चाटनासंदर्भात पुढे येणे गरजेचे आहे. तंबाखू शरीरासाठी कसा वाईट परिणाम करणारा आहे, याची सविस्तर माहिती अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे व ही चळवळ शाळा तसेच महाविद्यालयातून चालवणे आवश्यक आहे, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागप्रमुख डॉ. के.एम. कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
भारतात तंबाखूविरोधात कायदा असला तरी त्यासंदर्भात जाणीव तसेच जागरुकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही. तंबाखूच्या निर्मूलनासाठी सामाजिक समर्थनाची नितांत गरज आहे. निव्वळ कायदे करून प्रश्न सुटणारा नाही, तर समाजातील घटकाने याची जाणीव करून घेऊन दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचेही डॉ. कांबळे म्हणाले. महाराष्ट्र शासनाने एका आदेशान्वये सुगंधित तंबाखू, सुपारी, पानमसाला व गुटख्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक व वितरणावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही या प्रतिबंधित वस्तू खुलेआम मिळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाची बंदी कुचकामी ठरली आहे. जगात दरवर्षी ५.५ खरब सिगारेटचे उत्पादन होत असून कोटय़वधी लोक सिगारेट ओढतात. भारतात १० अरब सिगारेटचे उत्पादन होत असून ७२ कोटी ५० लाख किलो तंबाखूचे उत्पादन होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जगात २०३० मध्ये मृत्यूची संख्या ८० लाखांवर पोहचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तंबाखूच्या दुष्परिणामापासून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागपुरातील १५ टक्के नागरिकांना मान व तोंडाच्या कर्करोगाचा धोका; – इंडस हेल्थचा निष्कर्ष
 नागपूर शहरातील १५ ते ४० टक्के पुरुष आणि स्त्रीयांना मानेच्या व तोंडाच्या कर्करोगाचा धोका असल्याचा निष्कर्ष इंडस हेल्थ प्लसने एका सर्वेक्षणातून काढला आहे. इंडस हेल्थ प्लसने त्यांचे भागिदार नागपूर स्कॅन सेंटरच्या सहाकार्याने शहरातील ९,३२१ पुरुष व ८३२६ स्त्रीयांची तपासणी करून हेल्थकेअर अ‍ॅबनॉर्मलिटी अहवाल प्रकाशित केला आहे. शहरातील ३५ टक्के पुरुष तणावामुळे धुम्रपान आणि धूम्रपानरहित तंबाखूच्या रूपाने नियमित सेवन करतात. त्यातील १५ ते २० टक्के पुरुषांना हृदय विकाराचा प्रचंड धोका आहे. ४० ते ५५ वयोगटातील २० टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रीया विडी, गुटखा, खैनी आदीचे सेवन करतात. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका दुप्पट आहे. ७ ते १० टक्के लोकांना डोक्याच्या कर्करोगाचा धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तंबाखूशी संबंधित आजारांकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. धूम्रपानाच्या धुरामुळेसुद्धा कर्करोग, श्वसनाचे आजार आणि आकस्मिक हृदय विकाराचा धोका संभवत असल्याचे इंडस हेल्थ प्लसचे प्रतिबंधात्मक तज्ज्ञ अमोल नायकवडी यांनी म्हटले आहे. जर सुरुवातीलाच तंबाखू सेवन बंद केले तर तंबाखुमुळे होणारे मृत्यू आणि आजार टाळता येतील. आजची तरुण मुले व मुली फॅशन आणि मित्र मैत्रिणींच्या दबावामुळे ही हानीकारक सवय लावून घेत आहेत. यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी तरुण पिढीला जागरुक करा, असा सल्लाही नायकवडी यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या कर्करुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण तंबाखूचे सेवन करीत असल्याचे आढळून आले आहे. जगात १०० कोटी नागरिक तंबाखूचे सेवन व धूम्रपान करतात. त्यातील २५ कोटी एकटय़ा भारतातील आहेत. भारतात दरवर्षी १ लाख ३२ हजार महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाची लागण होते. त्यातील ७२ हजार महिलांना प्राण गमवावे लागते. महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या कर्करुग्ण महिलांमध्ये ६२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शहरातील १ टक्के महिला तंबाखूचे सेवन अथवा धूम्रपान करतात, तर ग्रामीण महिलांमध्ये हे प्रमाण २ टक्के आहे. भारतातील प्रत्येक तिसरी व्यक्ती तंबाखूचे सेवन अथवा धूम्रपान करतो.