कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उत्पन्न १६९ कोटींनी घटले

उत्पन्नाचे अवाच्या सव्वा उद्दिष्ट आखून बडय़ा बाता मारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढीचे दावे फुसका बार ठरू लागले असून मागील आर्थिक वर्षांत या महापालिकेचे उत्पन्न सुमारे १७० कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

उत्पन्नाचे अवाच्या सव्वा उद्दिष्ट आखून बडय़ा बाता मारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढीचे दावे फुसका बार ठरू लागले असून मागील आर्थिक वर्षांत या महापालिकेचे उत्पन्न सुमारे १७० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षभरात एलबीटी, मालमत्ता, पाणीपट्टी यांसारख्या करांच्या माध्यमातून ६३० कोटी ४६ लाख रुपयांचा महसूल वसूल करणे आवश्यक होते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर महापालिकेने प्रत्यक्षात ४६० कोटी ८८ लाखांचा महसूल गोळा केला आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे दावे फोल ठरले आहेत.
महापालिकेला स्थानिक संस्था कर (एल.बी.टी) वसुलीत तब्बल ३९ कोटीचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेने ५८६ कोटी ३४ लाखांचा महसूल वसूल केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महापालिकेने १२५ कोटी ४६ लाखाने कमी वसुली केली आहे. गेल्या वर्षी कर विभागाच्या प्रमुख तृप्ती सांडभोर यांनी नियोजन करून मालमत्ता कराची वसुली २०० कोटींच्या घरात पोहचविली होती. मात्र, काही बिल्डर धार्जिण्या धोरणामुळे यंदा उत्पन्न घटल्याचे दिसून येत आहे. नगररचना विभागाने गेल्या वर्षांत १३८ कोटी रुपयांची वसुली करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात या विभागाने ८९ कोटी ४७ लाखांची वसुली केली आहे.
कर वसुलीचे उद्दिष्ट
एल.बी.टी विभागामार्फत १८० कोटी वसुलीचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. प्रत्यक्षात १४० कोटी रुपये जमा करणे शक्य झाले आहे. मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट २२६ कोटींचे होते, प्रत्यक्षात १८३ कोटी रुपये जमा झाले आहेत. इतर विभागांतील वसुलीचे उद्दिष्ट गाठणेही शक्य झालेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kalyan dombivali mahanagarpalika revenue decrease

ताज्या बातम्या