कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीबीडी येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉइज युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात कोकण रेल्वेचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी युनियनच्या वतीने मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पेन्शनबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय व युनियनशी झालेल्या कराराची अंमलबजावणी करणे, चुकीच्या पद्धतीने आयकर शुल्क कपात केल्याने कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांच्या झालेल्या नुकसानीबाबत निर्णय घेणे, कोकण रेल्वेचे मुख्यालय बेलापूरहून मडगावला स्थलांतरित करू नये, वेल्फेअर संस्थेच्या कामगारांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर घरे बांधण्यासाठी दिलेल्या २७ कोटी रुपयांची चौकशी करण्यात यावी, १ जानेवारी २०१४ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास कोकण रेल्वेच्या स्थानकांवर,मार्गावर तसेच वसाहतीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा युनियन दिला आहे. २० ते २५ वष्रे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्याने त्यांचे भवितव्य असुरक्षित झाले असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मोहन खेडकर यांनी सांगितले.  द्वारसभेत युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगी व कार्यकारी अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनीदेखील उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.