कुठे १२ नाटकांची मालिका..कुठे १२ पुस्तकांचे प्रकाशन..कुठे १२ भाषेतील शब्दकोष जनतेसाठी खुला, तर कुठे १२ कलांचे मुलांना मोफत प्रशिक्षण, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून बुधवारी १२ डिसेंबर रोजी १२:१२:१२ चा दुर्मीळ योग साधला गेला. हा योगच असा होता की, तो साधण्यासाठी उपक्रम वेळेवर सुरू करणे आयोजकांना भागच पडले. त्यामुळे एरवी नियोजित वेळेपेक्षा एक-दोन तास उशिरा कार्यक्रम सुरू होण्याची सवय अंगी बाळगलेल्यांनाही नाईलाजास्तव बुधवारी नियोजित वेळ पाळणे भाग पाडले.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात १२:१२:१२ ची जबरदस्त मोहिनी दिसून आली. विशेष म्हणजे बहुतेकांनी या मुहूर्तासाठी कित्येक महिने आधीच उपक्रमांचे आयोजन करून ठेवले होते. त्यामुळेच या दिवशी पुस्तक प्रकाशित करण्याची जणूकाही स्पर्धाच दिसून आली. नाशिकच्या गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलात सकाळी ११ वाजेपासूनच गजबज सुरू झाली होती. अक्षरमुद्रा प्रकाशनच्या वतीने सी. एल. कुलकर्णी यांच्या १२ वेगवेगळ्या पुस्तकांचे प्रकाशन हे त्याचे कारण. इंदूरचे परमपूज्य रामानंद महाराज आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. मेघावळ, अनुभूती, स्पर्श अस्पर्श, अन्वय, नाथ पालखी, स्मृतिचिन्हे या ललित संग्रहांसह स्वच्छंद, अनुकंपा, डोहतळ, स्नेहदग्ध, ओघळांचे नकाशे आणि अनन्यशर हे काव्यसंग्रह यावेळी प्रकाशित करण्यात आले. माधुरी कुलकर्णी यांसह अक्षरमुद्राच्या श्रेयसी रहाळकर यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमास साहित्य रसिकांनी गर्दी केली होती.
एकिकडे मुद्रित माध्यमांमध्ये अशी घडामोड होत असताना संगणकीय भाषा आत्मसात केलेल्या सुनील खांडबहाले यांच्या  ‘खांडबहाले डॉटकॉम’ कडून १२ भाषांमधील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले करण्याचा कार्यक्रम गंगापूर रोडवरील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागात रंगला. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत khandbahale.com या संकेत स्थळावर सर्वासाठी मोफत उपलब्ध झाला आहे. नोकियाचे माजी उच्च अधिकारी ग्रेगोरी स्माईली, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी रवि आंधळे, महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी के. एम. सोनवणे, आयएमआरटी महाविद्यालयाचे संचालक डी. डी. वाळके, छायाचित्रकार प्रसाद पवार, प्रसिध्द कापूस शिल्पकार राजेंद्र खैरनार, प्रसिध्द कवि-लेखक संतोष हुदलीकर, एआयएलएसजीचे क्षेत्रिय संचालक प्रकाश पानगम, डिजीटल डिझायनर दिनेश पैठणकर, एनबीटी लॉ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य आणि स्वत: सुनील खांडबहाले या १२ जणांनी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी संगणकाची कळ दाबून १२ शब्दकोष सर्वासाठी खुले केले.  साहित्य क्षेत्रात असे उपक्रम होत असताना नाटय़ क्षेत्र मागे कसे राहील? दीपक मंडळाच्या सांस्कृतिक विभागाने महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी १२ वाजून १२ मिनिटांच्या मुहूर्तावर आपली १२ नाटकांची मालिका सुरू केली. ती मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार होती. विशेष म्हणजे या १२ नाटय़ प्रकारांचे विषयही १२, दिग्दर्शकही १२, तासही १२ आणि कलाकारांची संख्या १२०. संगीत कालाय तस्मै नम: या नाटय़ प्रकाराने या उपक्रमास सुरूवात झाली. त्यानंतर वनराई, संत सूरदास, किरण कुलकर्णी यांचा एकपात्री प्रयोग, छूम छूम खडा, प्रतिमा भास:, जर्नी ऑफ सक्सेस, चामखीळ, जननी जन्म भूमिश्च:, द पाथ, पाणी वाचवा, रात्र काळी घागर काळी याप्रमाणे नाटय़प्रकार सादर होत गेले. उपक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी, विजय शिंगणे यांसह सर्व दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते.
गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात सीडीओ मेरी शाळेतील शिक्षक अशोक नागपुरे यांनी भारताच्या १२ राष्ट्रपतींची चित्रे १२ तासात १२ मीटर कागदावर रेखाटली. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन्, झाकीर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद, नीलम संजीव रेड्डी, ग्यानी झैलसिंग, व्ही. आर. व्यंकरमण, शंकददयाळ शर्मा, के. आर. नारायणन्, एपीजे अब्दूल कलाम, प्रतिभाताई पाटील, व्ही. व्ही. गिरी यांची चित्रे रेखाटण्यात आली.  खान्देशातील ग्रामीण भागातही १२:१२:१२ चे आकर्षण दिसून आले. धुळे जिल्ह्यातील कापडणे या छोटय़ाशा गावात अहिराणी भाषेत रामदास वाघ यांनी लिहिलेल्या १२ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा एखाद्या विवाह सोहळ्याप्रमाणे रंगला. घरचं कार्य असल्यागत गावातील प्रत्येक जणाने या कार्यक्रमासाटी आपले योगदान दिले. बोरसे विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सावली, शेतकरी एक जीवनकैदी, म्हातारपननी काठी, तुना काय बापनं जासं?, आख्यान, सत्ता मेज जयते, माय नावना देव, याले जीवन असं नाव, वास्तव अवास्तव, खरं से खोटं सांगणार नाही, एक बिघा जमीन, या १२ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या शिवायही अनेक ठिकाणी संस्था व संघटनांनी हा मुहूर्त साधत उपक्रमांना सुरूवात केली.