महाराष्ट्र दिन चिरायू होवो..
महाराष्ट्र दिन चिरायू होवो.. जय जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देत शहरातील शासकीय, निमशासकीय आणि राजकीय संस्था विविध भागात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तर महाराष्ट्र दिनाला विरोध करीत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटनांनी शहरातील धरणे, आंदोलन, मिरवणुका आणि निदर्शने करीत निषेध केला.
कस्तुरचंद पार्कमध्ये झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५४ व्या वर्धादिनानिमित्त पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, सह पोलीस आयुक्त संजय सक्सेना आदी शासकीय अधिकारी व स्वातंत्र्य संग्राम सैनिक उपस्थित होते.
 यावेळी शिवाजीराव मोघे म्हणाले, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. भाषिक प्रांत रचनेनुसार मराठी भाषिकांचे अखंड राज्य स्थापन करण्यात आले. देशाच्या आंतर सुरक्षेसाठी राज्यातील पोलीस उत्तम कार्य बजावत आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी तसेच जागतिक स्पर्धेत भारताचा कामगार पुढे राहावे यासाठी राज्य प्रयत्नशील आहे.
यावेळी पोलीस सेवेतील परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक गौरव सिंह यांच्या नेतृत्वात संचलन सादर करण्यात आले. संचलनात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ ते नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण हिरपूरकर यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वात राज्य राखील पोलीस बल, गडचिरोली, पोलीस उपनिरीक्षक गौरव इंगोले यांच्या नेतृत्वात नागपूर शहर पोलीस आणि पोलीस उपनिरीक्षक संजय सिंह, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा लांडें, टिकाराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज ओरके, रेखा डंभारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश लोखंडे यांच्या नेतृत्वात संचलन सादर करण्यात आले.
पोलीस सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळालेल्या पोलीस निरीक्षक माधव गिरी (गुन्हे शाखा नागपूर शहर पोलीस), पोलीस निरीक्षक रमेश बद्रे (वाहतूक पूर्व), पोलीस निरीक्षक दगुभाई शेख (वाहतूक उत्तर), सुनील किनगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्याम बोरीवार, हेमंतकुमार पांडे, भागवतप्रसाद मिश्रा, नागपूर ग्रामीणचे रामाश्रय मिश्रा, राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ४ चे पोलीस उपनिरीक्षक अशोकलाल सिंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चरडे, अशोक वानखेडे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३चे पोलीस उपनिरीक्षक कौशल दुबे, सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक तायडे यांचा पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शहीद सहायक पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर माहुरकर यांना मरणोत्तर जाहीर झालेले पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र पत्नी निर्मला माहुरकर यांनाा देऊन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या सिव्हील लाईन कार्यालयात महापौर अनिल सोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, उपआयुक्त हेमंत पवार, प्रगती पाटील, विकास ठाकरे यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाचे स्वागत करून शिवसेनेतर्फे शहरातील विविध भागातील चौकात जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शहरातील विविध चौकात डीजेवर महाराष्ट्र गीते वाजविण्यात येऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. रेशीमबागेतील शिवसेना कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांंनी महाराष्ट्र दिनाचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्धा रोड आणि लक्ष्मीभवन चौकात पूर्व विदर्भ प्रमुख हेमंत गडकरी आणि प्रवीण बरडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.