पावसाळ्यात सर्वात मोठा फटका बसतो तो वीज वितरण कंपनीला. याचा विचार करून महावितरणने मान्सूनपूर्व कामांची मोठय़ा प्रमाणात तयारी सुरू केली आहे. यावर्षी अवकाळी पावसाने फेब्रुवारी महिन्यापासूनच तडाखा दिल्याने महावितरणचे सुमारे ५० लाख रुपये नुकसान झाले. पुढे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे.
येणारा प्रत्येक पावसाळा हा महावितरणसाठी आव्हान असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळामुळे, अवकाळी पावसाने वीज पुरवठय़ावर परिणाम होतो. याचा फटका उघडय़ावर असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेला बसतो आणि पर्यायाने त्याचा विपरीत परिणाम ग्राहक व ग्राहकसेवेवर होतो. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत रहावा म्हणून महावितरणने मोठय़ा प्रमाणात मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. काही ठिकाणी तारांवर घासत असतात. ते टाळण्यासाठी पूर्वपरवानगीने झाडांच्या फांद्या कापल्या जात आहेत. तारांवर अडकलेले पतंग, मांजा काढले जात आहेत. तारा ओढून पक्क्या केल्या जात आहेत.
वीज पुरवठा यंत्रणेवर झाकणे लावली जात आहेत. रोहित्रामधील तेलाची पातळी तपासून योग्य केली जात आहे. उकरणांमध्ये वंगण केले जात आहे. अर्थिग सुयोग्य केले जात आहे. वीज यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती उपकरणांचा साठा करून ठेवला जात आहे. नागरिकांनीही त्यांच्या निवासस्थानातील वीज पुरवठा करणारे वायर तपासून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खांबांना बांधलेल्या तारा काढून टाकण्यास सांगितले जात आहे. मीटरवर पाणी गळणार नाही, यासाठी भिंत तसेच त्यावर झाकणे लावावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2014 रोजी प्रकाशित
नुकसान टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली
पावसाळ्यात सर्वात मोठा फटका बसतो तो वीज वितरण कंपनीला. याचा विचार करून महावितरणने मान्सूनपूर्व कामांची मोठय़ा प्रमाणात तयारी सुरू केली आहे.
First published on: 22-05-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran prepare for prevent damage