कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कामकाजातील अनेक गैरव्यवहार, भोंगळ कारभाराचे नमुने पुढे येत आहेत. आता सन २०१२-२०१३ या अर्थसंकल्पातील विकासकामांसाठी केलेली आर्थिक तरतुदीची मुदत ३१ मार्च रोजीच संपली असूनही अर्थसंकल्पातील तरतुदीचा वापर चालू आर्थिक वर्षांतील विकास कामांसाठी केल्याचा प्रकार डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ८९ राजाजी रोड प्रभागात उघडकीला आला आहे. या प्रभागात तीन तुकडय़ांमध्ये २९ लाख ९० हजार ६०४ रुपयांची पदपथ, गटारे बनविण्याची कामे मजूर कामगार संस्थांकडून करून घेण्यात आली आहेत.
माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ च्या ७३(ड) कलमा अन्वये या कामांना स्थायी समिती, महासभेची मंजुरी न घेता मंजुरी दिली आहे. आयुक्त सोनवणे यांची बदली झाल्याने त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या कामांची जंत्री आता उघड केली जात आहे. त्यामधून हा प्रकार उघडकीला आला आहे.
सन २०१२-१३ या आर्थिक वर्षांत रस्ते, गटारे, पदपथासाठी पालिकेने आर्थिक तरतूद केली असेल, तर तो निधी त्याच आर्थिक वर्षांत म्हणजे ३१ मार्च २०१३ पर्यंत वापरणे आवश्यक आहे. या कालावधीत हा विकास निधी वापरला नाही तर तो आपोआप रद्द (लॅप्स) होतो. याबाबत शासनाचे वेळोवेळी अध्यादेश आहेत. असे असताना रामनाथ सोनवणे यांनी मागील अर्थसंकल्पातील कामांच्या आर्थिक तरतुदी रद्द झाल्या असताना सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षांत मागील कामे करण्यास मंजुरी दिली कशी असे प्रश्न आता उपस्थित करण्यात आले आहेत.
२९ लाख ९० हजार रुपयांची ही कामे ९ लाख ९८ हजार, ९ लाख ९४ हजार आणि ९ लाख ९७ हजार अशा तीन तुकडय़ांमध्ये ८ मे २०१३ रोजी प्रशासकीय आदेश क्रमांक ४३, ४४ आणि ४५ क्रमांकाने मंजूर करण्यात आली आहेत. २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील ए.सी.ई ०१०१०३, ०१०११९ लेखाशीर्षकांतर्गत विशेष रस्ते, गटारे, पायावाटांच्या निधीतून ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. कोणीही नगरसेवक, पदाधिकारी आपल्या विरोधात जाऊ नये म्हणून माजी आयुक्तांनी अशा प्रकारची ‘फेव्हरेट’ कामे केल्याची पालिकेत चर्चा आहे. अशा मंजुऱ्या दिलेली प्रकरणे पालिकेतून बाहेर काढण्याचे काम काही जागरूक नागरिकांकडून सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या प्रभागात ही कामे करण्यात आली आहेत.
याबाबत मुख्य लेखा अधिकारी अनुदीप दिघे यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. प्रभारी कार्यकारी अभियंता परवेझ तडवी यांनी सांगितले, अशा कामांची प्राकलने तयार केली असतील. ही सगळी माहिती फाइलमध्ये बघून सांगावी लागेल. आपण साइटवर आहोत, असे सांगून त्यांनी या कामांची आवश्यक माहिती लिहून घेतली.