सुयोग्य पुनर्वसन सोडाच हाताशी असलेले गोधन संपले आणि दुग्धोत्पादनाचा व्यवसायही बुडाल्याची वेळ मिहान प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. ‘न्याय मिळेल’, असे पाच वर्षांपूर्वी आश्वासन देणाऱ्या सोनिया गांधींकडून अद्यापही न्याय मिळाला नाही. गुरुवारच्या नागपूर दौऱ्यात तरी त्या न्याय देतील, अशी आशा मिहानग्रस्त बाळगून आहेत.
मानवाची प्रगती केवळ औद्योगिक विकासानेच होत असल्याच्या धारणेतून महाराष्ट्र शासनाने नागपुरात मिहान प्रकल्प उभारण्याचे ठरविले. प्रकल्प साकारणे दूरच उलट देशोधडीला लागण्याची वेळ आली असल्याचे अनेक प्रकल्पग्रस्तांनी बोलून दाखविले. मिहान प्रकल्पासाठी खापरी, दहेगाव, इसासनी, तेल्हारा, शिवणगाव, परसोडी, भामटी, कलकुही, जयताळा व कोतेवाडा गावातील साडेचार हजार हेक्टर जमीन २००२पासून अधिग्रहित केली. ही जमीन शेतीची होती. सुपीक व ओलिताची असलेल्या या शेत जमिनीने अनेक कुटुंबांना समृद्ध केले. घरोघरी, प्रत्येक कुटुंबात गायी-म्हशी, शेळ्या होत्या. शेतीला पुरक दुग्धोत्पादनाचा व्यवसाय असल्याने संपन्नतेचे जीवन हे लोक जगत होते. प्रकल्पासाठी हा परिसर राखीव झाला. जमीन अधिग्रहित केल्याने शेती गेली आणि उभी पिकेही नष्ट झाली.
जमीन अधिग्रहण होऊ लागले तसतसे समृद्धी संपू लागली. हिरवा चारा गुरा-ढोरांना मिळेनासा झाला. परिणामी पशुधन नष्ट होऊ लागले. अनेकांना गुरे-ढोरे विकावी लागली. त्यामुळे दुग्धोत्पादनाचा व्यवसायही ठप्प पडला. वीस हजार लिटरहून अधिक दूध तसेच भाजी शिवणगाव पंचक्रोशीतून नागपूर शहराचा उदरनिर्वाह चालत होता. शेत नाही त्यामुळे पिके नाही, पिके नाही त्यामुळे चारा नाही, चारा नाही त्यामुळे पशुधन नाही, दुग्धोत्पादनही नाही, शेत जमीन व दुग्धोत्पादन नाही त्यामुळे पैसा नाही, अशा दुष्टचक्रात मिहान प्रकल्पग्रस्त गावकरी सापडले. वर्षांतून सुमारे एक कोटी लिटर दूध व शेकडो किलो भाजी पुरविणारे रस्त्यावर आले असल्याचे या प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. अद्यापही सुयोग्य पुनर्वसन न झाल्याने शिवणगाव पंचक्रोशित असंतोष धगधगत असल्याचे चित्र आहे.
कार्गो हब अन्याय विरोधी कृती समितीच्या माध्यमातून मिहान प्रकल्पग्रस्तांचे २००२ पासून आंदोलन सुरू आहे. पुनर्वसनाचा सुयोग्य मोबदला अद्यापही प्रकल्पग्रस्तांना मिळालेला नाही. ३ जुलै २००८ रोजी नवी दिल्लीत जाऊन प्रकल्पग्रस्तांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. आपबिती सांगून मिहान प्रकल्पाला विरोध नाही मात्र सुयोग्य मोबदला व पुनर्वसन व्हायला हवे, अशी मागणी करीत न्याय देण्याची विनंती केली. ‘न्याय मिळेल’, असे वचन त्यांनी तेव्हा दिल्याचे समितीचे संयोजक बाबा डवरे यांनी सांगितले. पाच वर्षे उलटली, अद्यापही न्याय मिळालेला नाही, असे ते म्हणाले. सोनिया गांधी वचनपूर्ती कार्यक्रमासाठी गुरुवारी नागपुरात येत आहेत. पाच वर्षांपूर्वी दिलेले वचन त्या पाळतील, अशी आशा मिहान प्रकल्पग्रस्त बाळगून आहेत.