नाशिकच्या मुलींनी सोलापूर येथे आयोजित १५ व्या राज्य अजिंक्यपद टेनिस व्हॉलीबॉल कनिष्ठ गट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. उपकनिष्ठ गटात मात्र नाशिकच्या मुले व मुलींना तृतीय स्थान मिळाले.
महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉल संघटना आणि सोलापूर जिल्हा संघटना यांच्या वतीने आणि सोलापूर येथील सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिक जिल्ह्य़ाच्या मुलींनी कनिष्ठ गटात अंतिम फेरीत यजमान सोलापूर जिल्ह्य़ाचा पराभव केला. त्यामुळे नाशिकची विजयी परंपरा कायम राखली गेली. हेमांगी ठाकूर, शुभांगी जगताप, तेजस्विनी वाळके, उषा भापकर, कावेरी शिरसाठ, कीर्ती धोंगडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर नाशिकने विजेतेपद पटकावले. याच गटात मिश्र दुहेरीतही नाशिकच्या हेमांगी ठाकूर आणि सुशांत साळवे या जोडीने अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत मुंबईला २-१ असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. उपकनिष्ठ विभागात मुले व मुली या दोन्ही गटांत नाशिकला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चारही गटातील पहिल्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या चारही गटांचे संघ गुजरातमधील भावनगर येथे आयोजित १५ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यानुसार नाशिकच्या मुलींचा संघ व मिश्र दुहेरीचा संघ हा राष्ट्रीय स्पर्धेत या दोन्ही गटांत खेळणार आहे. नाशिकच्या विजयी खेळाडूंना किरण घोलप, गणेश तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.