सर्वसाधारणपणे आतापर्यंत घरगुती तसेच रस्त्यांवरील दिवाबत्तीपुरताच मर्यादित असणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर औद्योगिक विभागातही होऊ लागला आहे. विजेच्या वाढत्या दरांमुळे त्या तुलनेत सौर ऊर्जा किफायतशीर ठरू लागल्याने आता उद्योजकांनीही हा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीतील पटेल रिटेल प्रा. लि.च्या या फूड पॅकेजिंग विभागात सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यात आले असून गुरुवार २ जानेवारीपासून हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
अंबरनाथ येथील तरुण उद्योजक आणि गौरव इलेक्ट्रॉनिक्सचे प्रवर्तक दीपक रेवणकर यांनी उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प ठाणे जिल्ह्य़ातील औद्योगिक विभागातील सर्वात मोठा असून त्यातून दररोज ५० केडब्ल्यूपी युनिट मिळू शकणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २०० पॅनल्स बसविण्यात आले असून त्याद्वारे निर्माण होणारी वीज थेट वापरली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७० लाख रुपये खर्च आला असून शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विभागातर्फे २१ लाखांचे अनुदान मिळाले आहे. तसेच प्रकल्पावर खर्च झालेल्या रकमेवर आयकर विभागातर्फे सवलतही मिळणार आहे. कंपनीला लागणाऱ्या एकूण विजेपैकी ३० ते ३५ टक्के वीज आता या सौर प्रकल्पातून मिळणार आहे. त्यामुळे कंपनीच्या वार्षिक वीज बिलात साडेसात लाख रुपयांची बचत होईल. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या पॅनल्ससाठी नियमित स्वच्छतेव्यतिरिक्त पुढील २५ वर्षे इतर कोणताही देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. प्रकल्पासाठी सत्तर टक्के खर्च या पॅनल्सचाच आहे. उर्वरित उपकरणांनाही पाच वर्षांची वॉरंटी आहे. त्यामुळे विजेचे वाढते दर आणि टंचाई लक्षात घेता सौर ऊर्जेचा हा पर्याय उद्योजकांसाठी फायद्याचा ठरणारा आहे.