वन्यप्राणी-पक्ष्यांचा पाणवठय़ाशेजारी ठिय्या
उष्णतेच्या तीव्र लाटेचा परिणाम झाल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. ताडोबात रोज शंभर गाडय़ा प्रवेश करत होत्या तेथे पारा ४८ अंशापर्यंत पोहोचल्याने आता दुपारच्या फेरीत केवळ फक्त २५ गाडय़ा येत आहेत. त्यातही बहुतांश पर्यटक उन्हाला घाबरून रिसोर्टमध्येच मुक्काम करत आहेत, तर वाघ, बिबट, हरणांसह बहुतांश वन्यजीव व पक्ष्यांनी तलाव व पानवठय़ाला घर करून तेथेच थंड पाण्यात मुक्काम ठोकला आहे.
हमखास व्याघ्रदर्शनामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प जगाच्या नकाशावर आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली असून १५ जूनपर्यंत ताडोबाचे बुकिंग हाऊसफुल्ल आहे. केवळ व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांची गर्दी होत असली तरी तीव्र उन्हामुळे ही गर्दी हळूहळू रोडावत असल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. रविवारी चंद्रपुरात ४७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली, तर सोमवारी पारा ४८ अंशावर पोहोचला होता. त्याचा परिणाम ताडोबातील दुपारच्या फेरीवर झालेला आहे.
मोहुर्ली गेटमधून दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दररोज २५ ते ३० वाहनांना प्रवेश देण्यात येत होता. आता हा आकडा निम्म्यावर आलेला आहे. सकाळच्या फेरीतही पर्यटक सकाळी ६ वाजता ताडोबात प्रवेश करतात आणि दहा वाजताच्या आतच परत येऊन रिसोर्टमध्ये मुक्काम करतात. तीव्र उन्हामुळे वाघ व बिबट जंगलाबाहेर पडून पानवठय़ात मुक्काम ठोकत आहेत. त्यामुळे अतिशय सहज व्याघ्रदर्शन होत आहे. मात्र, तीव्र उन्हामुळे पर्यटकांनी रिसोर्टमध्ये मुक्काम करणे अधिक पसंद केले आहे.
कडक उन्हाचा फटका वन्यप्राणी व पक्ष्यांनाही बसलेला आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील बहुतांश वन्यप्राणी व पक्ष्यांनी तीव्र उष्णतेमुळे तलाव व पानवठय़ाला घर करून तेथेच थंड पाण्यात
मुक्काम ठोकला आहे. येथील श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक अभिषेक येरगुडे यांनी दोन दिवसापूर्वी
ताडोबा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी वाघ, हरण व काही पक्ष्यांची छायाचित्रे घेतली असता सर्व वन्यप्राणी पानवठय़ाशेजारी थंड पाण्यात ठिय्या देऊन बसलेले दिसले. या पक्षी व प्राण्यांना तीव्र उन्हाचा त्रास होत आहे.
उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी म्हणून पक्षी व वन्यप्राण्यांनी पानवठय़ांचा आधार घेतला असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ४८ अंश सेल्सिअसमध्ये पक्षी आकाशात उडू शकणार नाही. उन्हामुळे त्यांचे पंख भाजतील. त्यामुळेच हिरव्या जंगलात राहूनही वाघ व इतर वन्यप्राण्यांसह पक्ष्यांनीही पानवठय़ाच्या शेजारी मुक्काम ठोकला असल्याचे त्यांनी सांगितले.