अवैध मासेमारीसाठी मच्छीमारांकडून जुन्या पद्धतीचा अपयशी प्रयत्न

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीसाठी मच्छीमारांचा शिरकाव म्हणजे पुन्हा एकदा पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी धोक्याची घंटा आहे. दोन दिवसांपूर्वी या जलाशयावर मच्छीमारांनी अवैध मासेमारीचा प्रयत्न केला.

तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारीसाठी मच्छीमारांचा शिरकाव म्हणजे पुन्हा एकदा पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी धोक्याची घंटा आहे. दोन दिवसांपूर्वी या जलाशयावर मच्छीमारांनी अवैध मासेमारीचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते अपयशी ठरले असले तरीही प्रकल्प प्रशासनाचे जलाशयावरील नियंत्रण ढासळल्याचेच ते द्योतक आहे, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. 

तोतलाडोह जलाशयावर १९९५ पासून मासेमारीवर बंदी घालण्यात आल्यानंतर अवैध मासेमारीला याठिकाणी पेव फुटले. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्याच्या सीमेवरील या जलाशयात दोन्ही राज्यातील मच्छीमारांनी अक्षरश: उच्छाद मांडला.
तेव्हापासूनच या व्याघ्र प्रकल्पात वनविभाग विरुद्ध मच्छीमार असा सामना सुरू झाला. याचा फटका दोन्ही राज्याच्या वनविभागाला बसल्यामुळे अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी संयुक्त गस्ती मोहीमही सुरू झाली. दरम्यान, चकमकी घडतच गेल्या आणि कधी मच्छीमार तर कधी वनविभाग एकमेकांवर वरचढ ठरत गेले. तरीही संयुक्त गस्ती मोहिमेमुळे अवैध मासेमारीला बऱ्याच प्रमाणात आळा बसला. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालिन क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक ए. एशरफ यांनी यांनी अवैध मासेमारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याठिकाणी मानसिंगदेव अभयारण्यासाठी नियुक्त केलेले चार वनपरिक्षेत्र अधिकारी, २५ वनरक्षक, राखीव पोलीस दलाच्या एका चमूची नियुक्ती केली. त्या परिसरातील गावांमध्ये सभा घेऊन मच्छीमारांना समजाविण्याचाही प्रयत्न झाला. जानेवारी २०१२मध्ये त्यांनी स्वत: तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक गिरीश वशिष्ठ, तत्कालिन परिविक्षाधीन सहाय्यक वनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी झऱ्र्याच्या बंदुकीने बोळीबार करून मच्छीमारांवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर अवैध मासेमारीसाठी मच्छीमारांनी त्या परिसरात ढुंकुनही पाहिल्याचे ऐकिवात नाही.
मात्र, रविवारी, ३० मार्चला पुन्हा एकदा १५०च्या समूहाने मच्छीमार चोरटय़ा मार्गाने या जलाशयात अवैध मासेमारीसाठी घुसले. बोटीतून आलेल्या मच्छीमारांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांवर दगडांचा मारा केला. प्रत्युत्तरात या जवानांनी गोळीबार करून त्यांना परतावून लावले.
मच्छीमारांनी एवढय़ा मोठय़ा संख्येने एकत्र येऊन दगडांचा मारा करण्याची जुनी पद्धत पुन्हा एकदा अवलंबली. त्यामुळे या जलाशयावरील प्रकल्प प्रशासनाचे नियंत्रण ढासळल्यामुळेच तर हा प्रकार झाला नाही ना, अशीही शंका आता घेतली जात आहे. वनविभाग आणि मच्छीमारांमध्ये रविवारी उफाळलेला संघर्ष म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Old methods not working for illegal fishing