पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल उत्तरोत्तर वाढत असून विसर्जनाच्या दिवशीही त्याची प्रचिती आली. महापालिकेने राबविलेल्या मूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रमास गणेशभक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे तब्बल १ लाख ४० हजार ५४१ गणेशमूर्ती आणि ५७ टन निर्माल्य संकलीत झाले. या उपक्रमांद्वारे गोदावरीसह इतर नद्यांमधील संभाव्य प्रदूषण रोखण्यात यश मिळाले.
जल प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन अथवा मूर्ती दान करण्यास गणेशभक्तांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिका, पर्यावरणप्रेमी संस्था यांच्याकडून करण्यात आले होते. महापालिकेने गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी ठिकठिकाणी खास व्यवस्था उपलब्ध केली. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली वाहण्याचे आवाहन अंनिसने केले होते. गणेश विसर्जनासाठी शहरातील सहाही विभागात २७ ठिकाणी पालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली. ज्या मूर्ती महापालिका संकलीत करणार आहे, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाणार असल्याचे महापौर अॅड. यतिन वाघ व आयुक्त संजय खंदारे यांनी म्हटले होते. महापालिकेतर्फे दरवर्षी हा उपक्रम नियोजनपूर्वक राबविला जात असून त्यास गणेशभक्तांचा प्रतिसाद लाभत आहे. गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ शकते.
यामुळे ठिकठिकाणी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते त्या विषयी जनजागृती करून गणेशभक्तांना मूर्ती दान करण्यासाठी विनंती करत होते. मूर्ती संकलन उपक्रमात सर्वाधिक म्हणजे ४९, ८७४ मूर्ती पंचवटी विभागात संकलीत झाल्या. पूर्व विभागात १४७३८, पश्चिम १६३५१, नाशिकरोड २०३४६, नवीन नाशिक १८१०९, सातपूर २११२३ या प्रकारे संपूर्ण शहरातून १ लाख ४०, ५४१ मूर्ती संकलीत करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. तसेच शहरातील सहा प्रभागातून ५७ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले.
या उपक्रमासाठी बांधकाम व आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यप्रवण राहिली. या कामात विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवून मूर्ती संकलनासाठी हातभार लावला. नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ‘निर्माल्यातून फुलाकडे’ हा उपक्रम गंगापूर धबधब्याच्या परिसरात राबविण्यात आला. यावेळी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याची विनंतीही करण्यात आली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
निर्माल्यापासून खत कसे तयार केले जाते याची माहिती प्रा. आनंद बोरा व सहकाऱ्यांनी दिली. यावेळी पाच हजार मूर्ती संकलीत करण्यात आल्या. विद्यार्थी कृती समितीने राबविलेल्या ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमास नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गोदापार्क येथे शहरातील भाविकांनी सुमारे ९,५०४ मूर्ती दान केल्याची माहिती अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली. समितीच्या दीडशे कार्यकर्त्यांनी मूर्ती दान करण्यासाठी भाविकांना आवाहन केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये सुमारे दीड लाख गणेश मूर्तींचे ‘संकलन’
पर्यावरणस्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल उत्तरोत्तर वाढत असून विसर्जनाच्या दिवशीही त्याची प्रचिती आली.
First published on: 20-09-2013 at 07:29 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and half ganesh idol in the collection