गणेश विसर्जनाच्या दिवशी कर्णकर्कश आवाजातील डिजे लावण्याची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड चढाओढ लागल्याचे स्पष्ट झाले असताना आणि या आवाजाचे दणके गणेशभक्तांबरोबर बंदोबस्तावरील पोलिसांनाही सहन करावे लागले असताना पोलिसांना गुन्हा नोंदणीसाठी केवळ एकच मंडळ सापडले. जेलरोड परिसरात मोठ्या आवाजात डिजे वाजविल्यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. म्हणजे, शहरातील मुख्य मिरवणुकीसह नाशिकरोड व इतर भागात वाजतगाजत उत्साहात निघालेल्या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदुषणाबाबतच्या सर्व नियमांचे इतर सार्वजनिक मंडळांनी जणू काटेकोरपणे पालन केल्यावर पोलीस यंत्रणेने अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले आहे.
गणपती बाप्पाला निरोप देताना वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावेळी ढोल-ताशांसोबत डिजे यंत्रणेचा वापर लक्षणिय वाढला आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या गगनभेदी ध्वनी यंत्रणेला बहुतेक सार्वजनिक मंडळांची पसंती लाभल्याचे यंदा  पहावयास मिळाले. अनेक मंडळांनी मिरवणुकीत आपले वर्चस्व दाखविण्यासाठी इतरांपेक्षा अधिक क्षमतेची डिजे यंत्रणा आणण्यावर भर दिला. काही मंडळांच्या डिजे यंत्रणेचा आवाज इतका जबरदस्त होता की, रस्त्यावर आजुबाजुला उभ्या असणाऱ्या भाविकांच्या छातीत धडकी भरत होती. बंदोबस्तावरील पोलिसांनाही या आवाजाच्या ताकतीची अनुभूती मिळाली. वास्तविक, विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून परवानगी दिली जाते. याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज प्राप्त झाल्यावर ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही याची हमी कार्यकर्त्यांकडून घेतली जाते. वाकडी बारव येथून निघालेल्या शहरातील मुख्य मिरवणुकीत एकूण २३ सार्वजनिक मंडळे सहभागी झाली होती. त्यातील जवळपास ७० टक्के सार्वजनिक मंडळांकडे डिजे यंत्रणा व ढोल-ताशे अशी संयुक्त वाजंत्री होती. सहभागी झालेल्या यातील एकाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने ध्वनी प्रदूषण नियमांचे बहुदा उल्लंघन केल्याचे दिसत नाही. कारण, पोलिसांच्या लेखी तसा एकही गुन्हा दाखल झालेला नाही.
गणेश विसर्जनासाठी दिलेल्या परवानगीच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून मोठय़ा आवाजात डिजे लावल्यावरून केवळ एकच गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. जेलरोडवरील सेंट फिलोमिना हायस्कूल जवळ संजय आडके व इतर तीन कार्यकर्त्यांनी मोठय़ा आवाजात डिजे यंत्रणा सुरू ठेवली. विसर्जनासाठी दिलेल्या परवानगीचे उल्लंघन केल्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस यंत्रणेने म्हटले आहे. मुख्य मिरवणुकीसह शहरातील गंगापूर रोड, सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी अशा सर्व भागात छोटय़ा-मोठय़ा गणेश मंडळांकडून डिजे यंत्रणेचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. ठिकठिकाणी बंदोबस्तावर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांना या यंत्रणेच्या आवाजाचा आवाका लक्षात आला. मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या भाविकांकडूनही या कर्णकर्कश आवाजाविषयी नाराजीचा सूर प्रगट झाला. परंतु, गणेश विसर्जनाच्या दिवशी जेलरोडवरील त्या मंडळाचा अपवाद वगळता इतरत्र कुठेही मोठय़ा आवाजात डिजे सुरू नव्हता, असे किमान पोलीस यंत्रणेच्या नोंदीवरून लक्षात येत आहे.