दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करण्यांसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले जाणार असल्याचे संकेत महसूल विभागाने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत सतत वाढत चालल्याच्या पाश्र्वभूमीवर व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सराफा बाजारपेठेत याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून ग्राहकांसाठी हा निर्णय अडचणीचा ठरणार असल्याने खरेदीवर परिणाम होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.
सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर काळाबाजार आणि जुगाराचे प्रमाण वाढते असा अनुभव आहे. पॅन कार्ड अनिवार्य केल्यास याला आळा बसण्याची शक्यता आहे. ग्राहकांसाठी हा निर्णय डोकेदुखी ठरणार आहे. कारण, दोन लाखापेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्याला पॅन कार्डची नोंदणी करणे सक्तीचे राहणार आहे. सराफा व्यावसायिकांनाही ग्राहकांचे रेकॉर्ड अपडेट ठेवावे लागणार आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सराफा व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई नव्या कायद्यानुसार केली जाईल.
चालू वर्षांच्या अखेरीस सोन्याचा भाव ३५ हजार रुपये तोळा होईल, असा अंदाज आहे. जुलै महिन्यात सोने २२ हजार रुपये तोळा होते. ताज्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षी ९६६ टन सोने भारताने आयात केले. सध्या मागणीत तेजी असल्याने आयात वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या सोने ३१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. खरेदीचा वेग कमी न झाल्यास नागपूर शहरातील सराफा व्यावसायिक ३०० कोटींचा व्यवसाय करतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. दिवाळीच्या सुमारास सोने खरेदीचे खरे चित्र समोर येईल.