पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह जलाशयावर तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा मच्छिमार आणि वनखात्याचे कर्मचारी यांच्यात गोळीबार झाल्याने या परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, दोन दिवसांपासूनच या परिसरात मच्छिमार आणि वनखात्याचे कर्मचारी यांच्यात चकमकी सुरूच होत्या, असे सूत्रांनी सांगितले.
तोतलाडोह जलाशयावर मासेमारीसाठी बंदी घातल्यानंतरही व्यापारी स्थानिक मच्छिमारांना हाताशी धरून अंधाराचा फायदा घेत गुप्तगंगा या गावातून सायकलने प्रवेश करतात. मासेमारीसाठी बोटीचा वापर न करता टायरच्या सहाय्याने रात्रभर जलाशयात जाळे टाकले जातात. रात्री बोट चालवता येत नसल्याने त्याचा फायदा मच्छिमार घेतात. सुरुवातीला जलाशयाच्या मध्यातील गोल पहाडीवरून मासेमारीची सूत्रे हलवली जात होती. अवैध मासेमारी करणारे हे व्यापारी गावठी बॉम्ब, दगड, तलवारीने सज्ज असतात. तीन वर्षांपूर्वी या व्यापाऱ्यांना वनखात्याच्या चमूने अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गावठी बॉम्बने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी थोडक्यात बचावले. मात्र, अनेकजण त्यावेळी जखमी झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र वनखाते अशी संयुक्त गस्त मोहीम सुरू करण्यात आली आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले. दरम्यानच्या काळात या संयुक्त गस्ती मोहिमेकडे दोन्ही राज्याचे दुर्लक्ष झाले आणि तीन वषार्ंपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली.
फुलेझरी येथील रहिवासी सुरेश कुमरे हा महाशिवरात्रीला अंबाखोरीला सहकुटुंब जात असताना त्याला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अडवले. त्यावेळी अवैध मासेमारीसाठी तुम्ही मच्छिमारांना कसे जाऊ देता असा वादही त्याने घातला. त्यानंतरही त्याला कुटुंबासह परत पाठवण्यात आले. त्यामुळे चिडलेल्या सुरेश कुमरे यांनी अवैध मासेमारीचे छायाचित्रासह पुरावेच सादर केले. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांनी अवैध मासेमारीवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी या परिसरात कार्यरत एका निसर्ग संरक्षण चमूनेसुद्धा अवैध मासेमारीबाबत क्षेत्रसंचालकांना कल्पना दिली होती.
सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पुरेसे कर्मचारी आणि विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे १०० जवानसुद्धा आहेत. तरीही अवैध मासेमारीवर प्रशासनाला नियंत्रण का मिळवता आले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (अधिक वृत्त मुख्य अंकात)

तोतलाडोह जलाशयातून दररोज सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीचे मासे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्यप्रदेशातील सिवनी व जबलपूरच्या बाजारात येतात. महाराष्ट्रापेक्षा मध्यप्रदेशात मोठय़ा प्रमाणावर मासे विक्रीसाठी जातात. यात नागपुरातील अनेक बडे व्यापारी गुंतलेले असून रामदासपेठेतील एका हॉटेल व्यावसायिकाचाही यात समावेश आहे. नागपूर-रामटेक मार्गावरील मनसर येथे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच माशांच्या ठोक विक्रीचे मोठे दुकान आहे. या ठिकाणी मासे साठवून ठेवण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज’सुद्धा आहे. टनाने या ठिकाणी मासे साठवून ठेवले जातात.

तोतलाडोह जलाशयावरील धरणासाठी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील मिळून सात गावांचे पुनर्वसन झाले. पुनर्वसनात गावे गेल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला. त्यावेळी पेंच मध्यप्रदेशने जुलै ते ऑक्टोबर हा काळ वगळता ८४ कुटुंबातील ३०५ सदस्यांना तोतलाडोह जलाशयावर दुपारी १२ ते ४ या वेळेत मासेमारीचे परवाने दिले. याचा फायदा अवैध मच्छिमार व्यापाऱ्यांनी उचलला आणि गावकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या माशांसाठी अधिकचे पैसे मोजले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे परवाने रद्द करण्यात आले, पण तोपर्यंत व्यापार बराच फोफावला होता.