शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १५वे त्रैवार्षिक महाअधिवेशन पाचगणी येथे झाले. या महाअधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पालकमंत्री शशिकांत शिंदे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, सदाशिव पाटील, नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की राज्याचा विकासदर हा देशाच्या विकासदरापेक्षा नेहमीच २ टक्के जादा राहिला आहे. राज्य आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण, साक्षरता आणि त्यामधील गुणवत्ता ही महत्त्वाची ठरते. सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यात आलेल्या कोटय़वधी रुपयांमधून शाळांमध्ये सुविधा निर्माण केल्या. दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची यंत्रणा उभी केली आहे. देशाला महाशक्ती व्हायचे असेल तर शिक्षण आणि बौध्दिक कौशल्यावर होता येईल. जपान आणि इस्त्रायल देशांसारखे देशाला आणि राज्याला बौद्धिक कौशल्यावर आणि ज्ञानाधारित गुणवत्तेवरच प्रगतिपथावर नेता येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाच्या व्यासपीठावर कोठेही जाऊ शकतील अशी पिढी घडवली पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षकांनी गुणवत्तेच्या आधारावर देशाची भावी पिढी तयार करावी. यासाठी तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजेत. राज्य शासन निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहे. एम.एस.सी.आय.टी. साठी तुम्हाला आणखी ६ महिन्यांची मुदतवाढ कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मध्यवर्ती स्वयंपाकघर करून गाडीने सर्व शाळांमध्ये भोजन पुरविण्याचा आमचा प्रयत्न असून ३८ हजार किचनशेड मंजूर केले. त्यापैकी २० हजार किचनशेड पूर्ण असून १८ हजार प्रगतिपथावर आहेत. राजीव गांधी विमा योजनेतून विद्यार्थ्यांना ८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. मात्र, प्राथमिक शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचे काम तुम्हाला करावे लागेल असेही ते म्हणाले.
वनमंत्री कदम, पालकमंत्री शशिकांत शिंदे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री सतेज पाटील यांची या वेळी भाषणे झाली. या वेळी आमदार सदाशिव पाटील यांना शिक्षकमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक समितीचे राज्याचे अध्यक्ष नाना जोशी यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी आनंदराव पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समिती सभपती जयश्री जंगम, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, शिवाजीराव साखरे, उदय शिंदे, संजय कळमकर आदींसह राज्यातून आलेले प्राथमिक शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय – मुख्यमंत्री
शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

First published on: 11-01-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive decision regarding teachers bid cm