महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी ‘मिशन पर्तिना’चा ध्यास घेतलेले महापालिका आयुक्त श्याम वर्धन आणि शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक यांच्या पदरी पहिल्याच दौऱ्यात निराशा आली. मोमिनपुरा कब्रस्तान मार्गावरील महापालिकेच्या हाजी अब्दुल मज्जीद उर्दू हायस्कूलला वर्धने आणि टांक यांनी भेट दिली तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांचा सुमार दर्जा पाहून दोघांचेही चेहरे उतरले.
चाचपणी करण्यासाठी वर्धने आणि टांक यांनी मुलांना साधी बेरीज-वजाबाकीची उदाहरणे सोडविण्यासाठी दिली होती. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातील मुलांची परीक्षा घेतली तेव्हा एकालाही ही उदाहरणे सोडविता आली नाहीत. निराश झालेले वर्धने या प्रकाराने चांगलेच संतापले होते. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला आणि शाळा निरीक्षकांना चांगली समज देऊन मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकविण्याच्या सूचना केल्या. गणित, इंग्रजी आणि अक्षर सुधारणा करून पुढच्या तपासणीच्या वेळेस कोणत्याही त्रुटी राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची तंबी यावेळी संबंधितांना देण्यात आली.
वर्धने आणि टांक यांनी संगणक विभाग, ग्रंथालये आणि अन्य काही वर्गानाही भेटी दिल्या. शाळेतील मोडक्या तोडक्या खिडक्या पाहून वर्धने यांचा पारा चढला. त्यांनी सहायक झोन आयुक्त राजू भिवगडे यांनी तातडीने शाळांच्या दारे-खिडक्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचे आदेश दिले. शाळेतील स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचेही वर्धने यांनी निरीक्षण केले. येत्या आठ दिवसात आपण पुन्हा शाळेला भेट देणार असून मुलांच्या अभ्यासात सुधारणा झालेली दिसलीच पाहिजे, असे सांगून वर्धने तेथून बाहेर पडल्यानंतर शिक्षिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, शाळा निरीक्षक गोवर्धन धाबेकर, मुख्याध्यापिका नुसरत नसीम हजर होते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
माहिती देण्यास टाळाटाळ; मनपा अधिकाऱ्यांना नोटीस
महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी ‘मिशन पर्तिना’चा ध्यास घेतलेले महापालिका आयुक्त श्याम वर्धन आणि शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक यांच्या पदरी पहिल्याच दौऱ्यात निराशा आली.
First published on: 03-09-2013 at 09:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School inspection by municipal commissioner shyam vardhan