अखिल भारतीय महाराष्ट्रीय भूलशास्त्रज्ञांची १६ वी राज्यस्तरीय परिषद व कार्यशाळा २३, २४ व २५ नोव्हेंबर २०१२ रोजी हॉटेल पॅव्हेलियन येथे आयोजित केली आहे. ‘सेफ’ अ‍ॅनेस्थेशीया, कोल्हापूर शाखा यांना २० वर्षांनंतर ही परिषद पुन्हा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.
भूलशास्त्रामध्ये अद्ययावत गोष्टी घडत आहेत. त्यासुध्दा आपल्या प्रॅक्टीसमध्ये उतरवाव्यात, नवनवीन प्रकारची औषधे येत आहेत. त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून प्रत्यक्षात उतरवावे या आणि यासारख्या बऱ्याच महत्त्वाच्या मुद्दय़ांवरती परिषदेमध्ये चर्चासत्र होणार आहे. याचबरोबर कार्यशाळेचे आयोजनसुध्दा केले आहे. या कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये डमी शरीरावर वेगवेगळे प्रयोग करून त्याचे ज्ञान खूप फायदेशीर होणार आहे, याचे प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर दुर्बिणीतून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी भूल ही किती निर्धोक व सुरक्षित पध्दतीने देता येईल याची सुध्दा प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. गंभीर प्रकारच्या प्रसूतीमध्ये द्यावी लागणारी भूल, त्याचप्रमाणे -हृदयशस्त्रक्रिया व मेंदूची शस्त्रक्रिया करताना द्यावी लागणारी भूल याची सुध्दा चर्चा करण्यात येणार आहे. यासह अन्य विषयांचाही ऊहापोह होणार आहे. या परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथून १ हजार भूलतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ.सुहास कलगटगी (अमेरिका), डॉ.प्रदीपदेसाई (इंग्लड), डॉ.अंजली कुसुरकर (इंग्लड) हे डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरीलडॉ. रमेश (चेन्नई), डॉ.सुनिल पंडय़ा (हैद्राबाद), डॉ.टी.व्ही.एस.गोपाळ (हैद्राबाद), डॉ.मिनाक्षी सुंदरम््(तंजावर), डॉ.एल.डी.मिश्रा (भुवनेश्वर), डॉ.ए.के.शेठ्ठी (दिल्ली), डॉ.दीपक टेंपे (दिल्ली) यासारखे बरेच राष्ट्रीय स्तरावरील नामांकित भूलशास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन नामांकित भूलशास्त्रज्ञ डॉ.दीपक टेंपे यांच्या हस्ते शुक्रवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. डॉ.दीपक टेंपे यांना भारत सरकारने डॉ.बी.सी.रॉय अ‍ॅवॉर्ड देवून सन्मानित केले आहे. ते सध्या पंत गंगाराम हॉस्पिटल दिल्ली येथे -हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या भूलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ही परिषद यशस्वी करण्यासाठी मिसाकॉन-२०१२ चे ऑर्गनायझींग चेअरमन डॉ.शिरीष पवार, ऑर्गनायझींग सेक्रेटरी डॉ.अमोल कोडोलीकर, ट्रेझरर डॉ.महेश म्हेतर, डॉ.आबासाहेब शिर्के, डॉ.विजय चव्हाण, डॉ.एस.एल.कुलकर्णी, डॉ.हेमा आलासे, डॉ.शिवाजी जाधव, डॉ.आमणगी, डॉ.प्रकाश पाटील, डॉ.ठकार आदी विशेष परिश्रम घेणार आहेत.