येथील पालिकेच्या विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची आज विषेश बैठकीद्वारे निवडी करण्यात आल्या.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष मुजप्फर शेख, मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदी उपस्थित होते. सकाळी सभापतीपदासाठी अर्ज स्वीकारण्यात येऊन दोन वाजेपर्यंत माघारीची मुदत देण्यात आली होती. सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने दुपारी प्रांताधिकारी यांनी सर्व अर्ज वैध ठरवत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.  स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष सौ. ससाणे, सार्वजनिक बांधकाम समितीवर राजश्री सोनवणे, सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी जायदा कुरेशी, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी मंगल तोरणे व उपसभापतीपदी अनिता ढोकणे यांची निवड करण्यात आली. याशिवाय पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीवर राजेंद्र महांकाळे यांची, तर शिक्षण, खेळ व सांस्कृतिक समितीवर श्रीनिवास बिहाणी यांची सभापती म्हणून वर्णी लागली आहे. स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षप्रतोद संजय फंड, अंजूम शेख व राजेश अलघ यांची निवड झाली. निवडीत फंड, शेख, तसेच बिहाणी, सौ. कुरेशी व ढोकणे यांचे पद यावर्षीही कायम ठेवण्यात आले.