कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामाची गती वाढवून शासकीय कार्यालयाला कार्पोरेट लुक देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ व्यवस्थापक कार्यालयाने ‘सायलेन्स हवर्स’ हा उपक्रम सुरू केला आहे.
‘सरकारी काम आणि सहा महिने काम’, अशी म्हणच सध्या रूढ झाली आहे. कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर या उक्तीची प्रचिती येते. अस्ताव्यस्त खुच्र्या व टेबल, कागदपत्रांचा ढिगारा, कार्यालयातील खुच्र्या रिकाम्या, जिन्यात अथवा िभती पानाच्या पिचकारीने रंगलेल्या, धूळ, अस्वच्छता, एखाद्या कर्मचाऱ्याभोवती गप्पांचा फड रंगला आहे, चाकरमाने कार्यालयाबाहेरच्या पानटपऱ्यांवर, कामासाठी वारंवार खेटा माराव्या लागतात, अधिकारी कार्यालयात नसले, असलेच तर त्यांच्या कैबीनमध्ये सुस्तावलेले वगैरे दृश्य अपवाद सोडल्यास बहुतांश कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर दिसतेच दिसते. सरकारी कार्यालयाचे हे स्वरूप आणि लोकभ्रम दूर सारण्याचा विडा मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे व्यवस्थापक ओ.पी. सिंह व इतर अधिकाऱ्यांनी उचलला आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ व्यवस्थापक कार्यालयात ‘सायलेन्स हवर्स’ हा उपक्रम सुरू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी पावणेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत आता या कार्यालयाचे दारे बंद राहतील. येथील अधिकारी वा कर्मचाऱ्यांची कुणालाच भेट घेता येणार नाही. अधिकारी वा कर्मचाऱ्यांना आत-बाहेर जाता येणार नाही. कामावर आल्यानंतर काही वेळ हा उत्साहाचा असतो. त्यामुळे त्याचा उपयोग करून अधिकारी वा कर्मचाऱ्याने मन लावून शांतपणे काम करावे. आवश्यक आणि गरजेचेच तेवढे बोलावे. कामाची गती वाढवावी. भरपूर काम करावे, असे आदेशच देण्यात आले आहेत. साडेबारा वाजेनंतर या कार्यालयाचे दारे उघडतील. मात्र, अधिकारी वा कर्मचाऱ्यांना आत-बाहेर जाताना वेळेची नोंद करावी लागणार आहे. भोजनावकाश सोडून अवास्तव बराचवेळ कुणी बाहेर असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाणार आहे.
‘सायलेन्स हवर्स’मध्ये प्रवेश बंद राहणार आहे. इतर वेळेत या कार्यालयात कुणालाही जाता येणार नाही. रेल्वेच्या इतर ठिकाणाहून अधिकारी वा कर्मचाऱ्यांना या कार्यालयात यायचे असेल तर त्याला त्याच्या अधिकाऱ्याचे पत्र आणावे लागणार आहे. त्या पत्राशिवाय त्यालाही प्रवेश दिला जाणार नाही. अधिकारी वा कर्मचाऱ्याचे नातेवाईक वा नागरिकांना कामाचे स्वरूप पाहूनच त्यासंबंधी नोंद केली जाईल व त्या संबंधित कर्मचाऱ्याला प्रवेशद्वाराजवळील अतिथी कक्षात बोलावून घेतले जाईल. कार्यालयात कर्मचाऱ्यांशिवाय कुणालाच जाता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘कोई भी जाओ, कभी भी जाओ, कैसेभी जाओ’ अशीच स्थिती कुठल्याही सरकारी कार्यालयांची आणि कर्मचारी आणि नागरिकांची मानसिकता झाली आहे. काही बाबींचा अपवाद सोडला तर त्याला रेल्वेही अपवाद नाही. केंद्रस्थानी एनडीए सरकार आल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून कामाची पद्धत सुधारा, कामाची गती वाढवा आदी अनेक सूचना केल्या होत्या. काम करा अथवा खुर्ची सोडा, असा सज्जड दम दिल्याचेही लोक सांगतात. त्यानंतरच नागपुरात ‘सायलेन्स हवर्स’चा उपक्रम सुरू झाल्याचे, तो चांगलाही असल्याचे आणि इतर शासकीय कार्यालयांनीही त्याचे अनुकरण करायला हवे, असे रेल्वे वर्तुळात बोलले जाते. या कार्यालयाच्या इमारतीचा आतील आणि दर्शनी भागही अगदी कार्पोरेट कार्यालयच वाटतो.

कामासाठी ऊर्जा : अवास्तव खर्च होणारी ऊर्जा सकारात्मक कामात उपयोगी ठरावी, अधिकारी वा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी, त्यायोगे कामाची गती आणि काम वाढावे, असा ‘सायलेन्स हवर्स’ या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी सांगितले. सकाळी पावणेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत उत्साहाची असते. उत्साहाने ओतप्रोत ही ऊर्जा कार्यालयीन कामकाजात लावली तर त्यामुळे कामाचा निपटारा भरपूर आणि गतीने होते. या उपक्रमामुळे कामात शिस्त येईल. शिथिलता टाळता येऊ शकेल. भरपूर ऊर्जा व शांततेत मन लावून नियोजनबद्ध काम चांगले व भरपूर प्रमाणात होईल. त्यामुळे त्याचा परिणामही चांगलाच होईल, असे ते म्हणाले.