ठाण्यात वृक्षांची कत्तल सुरूच

तुळशीधाम येथील १४८ झाडे तोडल्याचा आरोप ठाण्यात खासगी विकसकामार्फत झाडांच्या छाटणीसाठी करण्यात येणाऱ्या परवानगी अर्जावर एकामागोमाग एक शिक्कामोर्तब करणाऱ्या ठाणे महापालिकेतील प्रशासन तसेच नगरसेवकांचे शहरात सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. तुळशीधाम येथील ग्रीन वूड कॉम्लेक्सजवळील अग्रवाल कम्पाऊंड येथे १४८ झाडांची बेकायदा कत्तल झाल्याची

तुळशीधाम येथील १४८ झाडे तोडल्याचा आरोप
ठाण्यात खासगी विकसकामार्फत झाडांच्या छाटणीसाठी करण्यात येणाऱ्या परवानगी अर्जावर एकामागोमाग एक शिक्कामोर्तब करणाऱ्या ठाणे महापालिकेतील प्रशासन तसेच नगरसेवकांचे शहरात सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. तुळशीधाम येथील ग्रीन वूड कॉम्लेक्सजवळील अग्रवाल कम्पाऊंड येथे १४८ झाडांची बेकायदा कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून ठाण्यातील काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी यासंबंधी माहिती महापालिकेला पुराव्यासह सादर करताच खडबडून जागे झालेल्या महापालिकेने जागेच्या मालकांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचा सोपस्कार उरकल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही महापालिकेच्या उद्यान विभागातील बडय़ा अधिकाऱ्यांवर झाडांच्या कत्तलींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर तुळशीधाम येथील झाडांच्या कत्तलींमुळे महापालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले असून कॉक्रिटीच्या जंगलांना जागा देण्यासाठी हिरवीगर्द झाडे कापली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
ठाणे महापालिकेने मध्यंतरी घोडबंदर मार्गावरील खासगी विकासकांना झाडांच्या कत्तलींसाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला होता. शेकडोंच्या संख्येने झाडांच्या छाटणीची परवानगी देण्याचा हा प्रस्ताव काहीसा वादग्रस्त ठरला होता. सत्ताधारी शिवसेनेतील काही नगरसेवकांनी या प्रस्तावाला हरकत घेतल्यानंतरही पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव हा प्रस्ताव मार्गी लावण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. घोडबंदर मार्गावरील बडय़ा बिल्डरांचे विकास प्रस्ताव या झाडांमुळे रखडण्याची भीती होती. त्यामुळे सदस्यांच्या मंजुरीला काहीशी संशयाची किनार होती. ठाण्याचे माजी महापौर तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक वैती यांनी या सर्व प्रस्तावासंबंधी काळजीपूर्वक निर्णय घेतला जावा, अशी मागणी महापौरांकडे केली होती. वैती यांचे हे पत्र म्हणजे शिवसेनेतील अस्वस्थतेचे प्रतीक मानले जात होते. झाडांच्या कत्तलींचा हा प्रस्ताव ताजा असताना तुळशीधाम येथील ग्रीन वूड कॉम्लेक्सजवळ अग्रवाल कम्पाऊंडमध्ये बेकायदा वृक्षतोड झाल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तक्रारीनुसार वृक्ष अधिकारी दिनेश गावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ५२ झाडांची कत्तल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर पंचनामा करून गावडे यांनी याबाबतची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु या जागेवर १०० हून अधिक झाडांची कत्तल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पालिकेने २००२ मध्ये केलेली वृक्षगणना आणि २०११ मध्ये जीपीएसच्या साहाय्याने केलेल्या मोजणीच्या आधारे येथे ७४६ वृक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या येथे ५९८ झाडेच शिल्लक आहेत. यामुळे १४८ वृक्षांची कत्तल झाली असल्याचा आरोप शिवसेनेच्या एका सक्रिय पदाधिकाऱ्याने केला आहे. यानुसार महापालिकेच्या वतीने अतम ओमप्रकाश अग्रवाल, विमलादेवी अग्रवाल आणि केवलकिसन अग्रवाल यांना नोटीस बजाविण्यात आली असून कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Slaughtering of trees continues in thane

ताज्या बातम्या