ठाणे पोलीस जागे झाले..

ठाणे शहरातील वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या सहा काश्मिरी तरुणांकडे परवाना नसलेल्या २५ बंदुका आढळून आल्याने खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी

ठाणे शहरातील वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या सहा काश्मिरी तरुणांकडे परवाना नसलेल्या २५ बंदुका आढळून आल्याने खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी शहरातील सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीचे शस्त्र परवाने तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. कासारवडवली भागात एका राहत्या घरात परवाना नसलेल्या २५ बंदुका आढळल्याने शहरातील शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परराज्यातील शस्त्र परवान्याची नोंद स्थानिक पोलिसांकडे करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवले जाते. अशा सुरक्षारक्षक संस्थांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
ठाणे येथील कासारवडवली गावातील तुकाई चाळीत राहणाऱ्या सहा काश्मिरी तरुणांकडे २५ बंदुका आढळल्या असून या बंदुकांच्या परवान्याची कोणतीही कागदपत्रे पोलिसांना मिळालेली नाहीत. हे सर्व तरुण ठाणे शहरातील वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतात. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागातील गृहसंकुलामध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्यांमध्ये परराज्यातील नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. त्यापैकी काही सुरक्षारक्षकांकडे त्यांच्या राज्यातील शस्त्र परवाने आहेत. असे असले तरी या परवान्याची नोंद संबंधित पोलीस आयुक्तालयात करणे बंधनकारक असते. मात्र अनेक सुरक्षारक्षक हे नियम धाब्यावर बसवीत असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून समोर आले आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त एस.पी.एस.यादव यांनी शहरातील सुरक्षारक्षकांचे शस्त्र परवाने तपासण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये सुरक्षारक्षक विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. अशा सुरक्षारक्षकांना कामावर ठेवणाऱ्या सुरक्षा एजन्सीचे परवाने रद्द करण्यात आले होते. या कारवाईमुळे अनेक सुरक्षा एजन्सी मालकांचे धाबे दणाणले होते. मात्र यादव सेवानिवृत्त होताच ही मोहीम थंडावली.
उशिराने शहाणपणे सुचले
ठाणे पोलिसांनी शहरातील सुरक्षारक्षकांचे शस्त्र परवाने तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त विलास चंदनशिवे यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील शस्त्रधारी सुरक्षारक्षकांचे परवाने तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये परराज्यातील शस्त्र परवाना असेल तर त्याची नोंद ठाणे आयुक्तालयात केली आहे का, याची पडताळणी करण्यात येत आहे. या कारवाईत दोषी आढळणाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Start checking of tool licenses