‘बाळासाहेबांचा हात झरझर चालत होता..हातात होता काळा स्केच पेन..साहेब कागदावर नेमके काय काढताहेत याची सर्वानाच उत्सुकता होती. अवघ्या पाच मिनिटांत कागदावरून त्यांचा हात फिरणे थांबले. त्यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी कागद आमच्या हाती दिला आणि एका विश्वप्रसिद्ध व्यंगचित्रकाराची जादू काय असते, ते आम्हाला दिसून आले. त्या कागदावर साहेबांनी महात्मा गांधी यांचे व्यंगचित्र काढले होते. त्याच्या खाली स्वत:ची स्वाक्षरी आणि दिनांकही..’
बाळासाहेबांकडून शिवसेनेच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, चाहत्यांना अनेक भेटी मिळाल्या असतील, परंतु एखाद्यासमोर व्यंगचित्र काढून त्याला ती भेट म्हणून मिळाली, असे क्वचितच घडले असेल. निफाड तालुक्यातील ओझरचे अशोक बाबुराव बोरस्ते हे अशा भाग्यवंतांपैकी एक. राजकीय व्यक्ती म्हणून बाळासाहेबांनी जितका दरारा निर्माण केला, तितकाच व्यंगचित्रांच्या क्षेत्रातही. विश्वातील काही निवडक व्यंगचित्रांमध्ये त्यांचा समावेश करण्यात येत होता, यावरूनच त्यांच्या व्यंगचित्रांमधील ताकद कळून यावी. त्यामुळेच बाळासाहेबांनी दिलेली भेट आपणांसाठी इतर कोणत्याही वस्तूपेक्षा अनमोल असल्याची बोरस्ते यांची भावना आहे.
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने निफाडमधून मंदाकिनीमाई कदम यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारार्थ १ सप्टेंबर रोजी बाळासाहेबांची निफाड येथे सभा झाली. त्या वेळी ते बोरस्ते यांच्या बंगल्यात मुक्कामी होते. बाळासाहेबांची सभा आणि त्यांच्या मुक्कामाचेही निश्चित झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य बंगल्याचा शोध सुरू झाला. त्या वेळी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि फारशा गर्दीत नसलेला बोरस्ते यांचा बंगला नुकताच पूर्णत्वास आला होता. हाच बंगला मुक्कामासाठी निवडण्यात आला. ‘मातोश्री’ हे नाव असणे, हेही एक कारण हा बंगला निवडण्यामागचे. बाळासाहेबांच्या सुरक्षा व्यवस्थेने बंगल्यास गराडा घातल्यानंतर कोणासही आतमध्ये जाणे मुश्कील झाले, परंतु अशोक बोरस्ते यांना मात्र विशेष परवानगी देण्यात आली होती.
एका शेतकऱ्याच्या मुलाने केलेली प्रगती पाहून बाळासाहेबांनी बोरस्ते यांचे विशेष कौतुकही केले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २ सप्टेंबर रोजी सकाळी नाश्ता घेतल्यानंतर साहेबांनी अचानक आपले सेवक थापा यांच्याकडे पेन आणि कागद मागितला, आणि रेखाटले गांधीजींचे व्यंगचित्र. हे व्यंगचित्र त्यांनी बोरस्ते यांना भेट म्हणून दिले. ही भेट किती किमती आहे, याची बोरस्तेंनाही जाणीव आहे. सकाळी अकराच्या सुमारास साहेबांचा ताफा पारोळ्याकडे निघाला, तेव्हा त्यांनी बोरस्ते यांच्या कुटुंबीयांसमवेत छायाचित्रही काढले. अशोक बोरस्ते यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रभान बाबुराव बोरस्ते यांनी साहेबांच्या अंगावर शाल पांघरली.
आपल्या मुक्कामामुळे कुटुंबीयांना काही त्रास झाला असेल तर, त्याबद्दल साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याआधी रात्रीच्या सभेत विरोधकांवर बरसणाऱ्या बाळासाहेबांच्या स्वभावातील ममत्वाची ही किनार पाहून बोरस्ते कुटुंबीयही भारावले. ही व्यक्ती इतकी महान का, हे त्यांना उमगले. साहेबांच्या जाण्याने बोरस्ते यांच्यापाशी उरल्यात केवळ आठवणी.