सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ७ ब च्या पोटनिवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचे कवित्व सुरूच असून, यात पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्यासह महापालिकेचे सभागृहनेते महेश कोठे यांच्यावर पक्षाच्या बंडखोरांनी निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ताकद कमी करण्याच्या हेतूने केवळ कोठे पिता-पुत्राचे ऐकून शहराध्यक्ष भोसले यांनी या पोटनिवडणुकीसाठी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोपही बंडखोरांनी केला आहे.
गेल्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजय कोळी हे निवडून आले होते. यात काँग्रेसचे केदार म्हमाणे यांना केवळ २३१ मते पडल्याने त्यांच्यावर अनामत रक्कम जप्त होण्याची पाळी आली. मागील २०१२च्या महापालिका निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे गौतम कसबे यांची उमेदवारी डावलून केदार म्हमाणे यांना संधी दिल्यामुळे एकूणच या पोटनिवडणुकीत पक्षाला सपाटून हार पत्करावी लागली. तर उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केलेले गौतम कसबे यांनी १३१६ इतकी मते घेऊन ताकद दाखवून दिली.
या पार्श्र्वभूमीवर कसबे यांचे ‘बाहुबली’ समजले जाणारे बंधू तथा डी. के. मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ कसबे यांनी पक्षाच्या पराभवाचे माप स्थानिक नेते विष्णुपंत कोठे व त्यांचे पुत्र महेश कोठे यांच्यासह पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न केला. भोसले हे कोठे पिता-पुत्राच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, यासंदर्भात शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कसबे यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचा अंतिम अधिकार पक्षश्रेष्ठींना असून यात आपला काडीचा संबंध नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.