राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रासह विदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांंनी गणराज्य दिनी रात्री शहरातील विविध महामार्गावरील टोल नाक्यांना लक्ष्य करून तोडफोड केली. तर काही टोल नाके बंद पाडले. कळमेश्वर, हिंगणा आणि दाभा मार्गावरील टोल नाक्यांची कार्यकर्त्यांंनी रात्री उशिरा तोडफोड केली. यात जिल्हा प्रमुख अजय ढोके यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना अटक केली. जिल्ह्य़ातील विविध भागातील टोल नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी कार्यकर्त्यांंची धरपकड सुरू केली आहे.
कोल्हापूरमध्ये टोलनाक्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यात विविध भागात टोल नाक्याच्या विरोधात नागरिकांमध्ये असलेला रोष बघता रविवारी गणराज्य दिनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यावर पैसे मागितले तर ते तुडवा, असे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर लागलीच काही वेळात महाराष्ट्रासह विदर्भातील विविध जिल्ह्य़ात त्याचे पदसाद उमटले. मनसेच्या कार्यकत्यार्ंनी विविध भागातील टोल नाक्यांवर धडक दिली. अनेक टोल नाक्यांवर रात्री पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे त्याचा फायदा घेत मनसेने रात्री उशिरा प्रथम कळमेश्वर आणि हिंगणा या भागातील टोल नाके बंद पाडले. या भागातील टोलनाक्यांवर कार्यकर्ते गेले असता त्या ठिकाणी पोलीस पोहोचले मात्र, त्यातही कार्यकर्त्यांंनी ते बंद पाडून त्यांची नासधूस केली. दाभाजवळील टोल नाक्यावर वीस ते पंचवीस कार्यकर्ते पोहोचले. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, कार्यकर्ते पोहोचले त्या काळात एकही पोलीस त्या ठिकाणी नव्हता. त्याचा फायदा घेत मनसेच्या कार्यकर्त्यांंनी नाक्याची तोडफोड सुरू केली. त्या ठिकाणी असलेले संगणक आणि टेबलखुच्र्यांची फेकाफेक केली. येथील कर्मचाऱ्यांनी तोडफोडीमुळे पलायन केले.
नाक्यावर रॉकेल टाकून तो पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लागलीच पाण्याने आग विझविण्यात आली. या घटनेनंतर विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील टोल नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. काही ठिकाणी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आले. मनसेचे कार्यकर्त्यांंची धरपकड सुरू केली असून पाच ते सहा प्रमुख कार्यकर्त्यांंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
या संदर्भात मनसेचे विदर्भ विभागीय संघटक हेमंत गडकरी म्हणाले, विदर्भातील विविध जिल्ह्य़ात अवैध टोल नाके असून त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. टोल नाक्यावर भरमसाठ वसुली केली जात असून नागरिकांना मात्र सुविधा दिल्या जात नाहीत. टोल नाक्यावर टोल आकारला जात असेल तर रस्ते चांगले केले पाहिजे. मात्र, सरकारची मानसिकता नाही. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सामान्य लोकांना त्रास देणे सुरू केले. शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे त्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांंची धरपकड सुरू आहे. जनहिताच्या दृष्टीने मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करीत असून आगामी काळात टोल नाके आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा गडकरी यांनी दिला.