उरण, नागाव व पिरवाडी किनाऱ्यांची १३ ते १६ जूनदरम्यान आलेल्या समुद्राच्या सर्वात मोठय़ा उधाणामुळे धूप झाली असून या किनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे वारंवार करूनही प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने नागाव तसेच उरण परिसरातील किनारपट्टी मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्त झालेली आहे. अर्ज-विनंत्या व मागण्या करूनही महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड व प्रशासनाने आश्वासन देऊनही ते न पाळल्याने येत्या १५ ऑगस्टपासून अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नागाव ग्रामपंचायतीने दिला आहे.
उरणच्या पश्चिमेस नागाव ग्रामपंचायत हद्दीत दीड  किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर ८०० मीटर लांबीचा मुख्य किनारा असून या किनाऱ्यालगत शेतकऱ्यांची शेती तसेच लोकवस्ती आहे. वातावरणातील बदलामुळे दिवसेंदिवस समुद्र या भागात आक्रमक होऊ लागला आहे. परिणामी या भागातील भूगर्भात समुद्राच्या पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने शेतकऱ्यांचा गोडय़ा पाण्याच्या विहिरीतही समुद्राचे खारे पाणी पाझरू लागल्याने विहिरींचे पाणीही खारट व पिण्यासाठी तसेच शेतीसाठी हानिकारक होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे याचा परिणाम शेतीवरही होऊ लागला आहे.
 किनारपट्टीची धूप थांबवून समुद्राच्या उधाणाचे पाणी थोपविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात २०१३ ला केलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्निल माळी यांना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने १ ऑगस्ट २०१३ ला पत्र पाठवून धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे लेखी आश्वासन दिलेले होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याची माहिती माळी यांनी दिली आहे.