कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि कोयना-चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीजवळ कृष्णा नदीतील पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढतच आहे. बुधवारी सायंकाळी आयर्वनि पुलानजीक पाणी पातळी २९ फुटांवर पोहोचली असून या ठिकाणी प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग ५५ हजार ५५० क्युसेक्स आहे. कोयना व चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने गुरुवारी दुपापर्यंत या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून कृष्णेच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याबरोबरच नदीपात्रातील पाणीही वाढले आहे. वारणा नदीने पात्राबाहेर आक्रमण केले असून नदीकाठच्या गवतपड जमिनीबरोबरच उभ्या पिकात शिरकाव केला आहे. शिराळा तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी अद्याप सुरूच आहे. काखे-मांगले, मांगले-सावर्डे, रेठरे-कोकरुड  या मार्गावर वारणेचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणातील पाणीसाठा ८८.६६ टी.एम.सी. झाला असून ८४.२३ टक्के धरणे भरले आहे. धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे १२ फूट ६ इंचाने वर उचलले असून या ठिकाणाहून ६१ हजार ९०४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दर सेकंदाला होत आहे. तर चांदोली धरणातून १७ हजार ७७, कण्हेरमधून ३३३८, राधानगरीतून ९२०० आणि दूधगंगेतून ७८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणारे राजापूर बंधाऱ्यानजीक कृष्णानदीची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ४१ फूट २ इंच होती. या ठिकाणाहून १ लाख २१ हजार २८३ क्युसेक्स पाणी दर सेकंदाला कृष्णेच्या पात्रातून वाहत आहे. तर हेच पाणी जमा होणाऱ्या अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद १ लाख २९ हजार ७२४ क्युसेक्स या प्रमाणात कृष्णेच्या पात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान कृष्णेच्या पाण्यामध्ये क्षणाक्षणाला वाढ होत असून नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. काल सायंकाळी मिरज तालुक्यातील ढवळी-म्हैसाळ रोडवरील पुलावरील कृष्णेचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अंकलखोप, भिलवडी, सुखवाडी, नांद्रे, वसगडे, दूधगाव, कवठेपिरान, औदुंबर, बहे, सांगलीवाडी, हरिपूर, अंकली,कृष्णा घाट, म्हैसाळ,ढवळी आदी नदीकाठी असणाऱ्या गावच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.