दर दिवशी ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची परिस्थिती सुधारण्यासाठी आता रेल्वे श्वेतपत्रिका काढणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळ या तीनही संस्थांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मिळून या श्वेतपत्रिकेचा आराखडा तयार केला आहे. मात्र याबाबत रेल्वे प्रवाशांच्याही सूचना मागवण्याची सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. प्रवाशांच्या सूचनांचा समावेश असलेली ही श्वेतपत्रिका जुलैच्या अखेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी वांद्रे येथील रेल्वेच्या सरकारी विश्रामगृहात झालेल्या डीसी-एसी विद्युत प्रवाह परिवर्तनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्र्यांसह खासदार गोपाळ शेट्टी, खासदार राजन विचारे, मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय आदी उपस्थित होते.

उपनगरीय रेल्वेमार्गावर सातत्याने होणारे बिघाड, त्या बिघाडांवरील उपाय, उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, त्यांची अंमलबजावणी आदी सर्व गोष्टींचा समावेश असलेली ही श्वेतपत्रिका तयार करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याआधीच रेल्वे अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार पश्चिम व मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसी यांच्या अधिकाऱ्यांनी या श्वेतपत्रिकेवर काम केले आहे. ही श्वेतपत्रिका जवळपास पूर्ण झाली असून त्यात उपनगरीय रेल्वेबाबतच्या विविध समस्यांवर तोडगा असेल. मात्र या श्वेतपत्रिकेबाबत प्रवाशांच्याही सूचना मागवण्यात याव्यात, अशी सूचना मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात प्रभू यांनी केली.

या सूचनेनंतर आता एका संकेतस्थळावर ही श्वेतपत्रिका जूनच्या मध्यापासून प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. प्रवाशांना त्या श्वेतपत्रिकेबाबत काहीही सूचना करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात येणार आहे. प्रवाशांनी केलेल्या व्यवहार्य सूचनांचा अंतर्भाव या श्वेतपत्रिकेत केला जाणार आहे. त्यानंतर ही श्वेतपत्रिका जुलैअखेपर्यंत मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे लागू करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री प्रभू यांनी स्पष्ट केले.

काय असेल श्वेतपत्रिकेत?

’ रेल्वेमार्गावर होणारे अपघात टाळण्याचे उपाय

’ उपनगरीय रेल्वे परिचालनात होणारे तांत्रिक बिघाड आणि त्यांवरील उपाय

’ ओव्हरहेड वायर आणि त्यासंबंधीची देखभालदुरुस्ती

’ प्रवाशांसाठी सुविधा आणि स्थानकांमधील सुविधा

’ प्रवासी सुरक्षेसाठीची उपाययोजना