मुंबई.. महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर, ही ओळख हरवते आहे काय असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना एकामागोमाग एक घडत आहेत. इस्थर अनुया या तरुणीची रेल्वे स्थानकातून बेपत्ता झाल्यानंतर झालेली हत्या आणि आता पवईत सुरक्षारक्षकाकडूनच तरुणीवर झालेला बलात्कार, या दोन घटनांनंतर महिलांसाठी मुंबई सुरक्षित नाही, असा सूर व्यक्त होत आहे. पण, या आणि अशाच काही घटनांचा आढावा घेतला तर त्यात एक समान धागा आढळतो, तो म्हणजे आपल्या सुरक्षेबाबत पीडित तरुणी किंवा तिच्या कुटुंबीयांनीच दाखविलेला हलगर्जीपणा. व्यक्तिस्वातंत्र्य आणि मुक्त वातावरणाचा आनंद घेण्यात काहीही गैर नाही. मात्र हा आनंद घेताना थोडीफार सावधगिरी बाळगली तरी अनेक गैरप्रसंग टाळता येऊ शकतील. गर्दीतून वाट काढतानाही आपण आपले पैशाचे पाकीट, सेलफोन वारंवार चाचपडून पाहतो. हीच सावधगिरी व्यक्तिगत सुरक्षेच्या दृष्टीने महिलांनी बाळगली तरी अनेक अतिप्रसंग टाळता येऊ शकतील.
सुरक्षारक्षकाचा बलात्कार..
पवईत राहणारी एक २५ वर्षीय तरुणी जुहू येथे नृत्यशिक्षिका म्हणून काम करते. घरातील मोकळे वातावरण आणि उशिरा पार्टीत जाणे, मद्यपान करणे या गोष्टी नित्याच्याच होत्या. गेल्या गुरुवारी ती नेहमीप्रमाणे पार्टीसाठी मित्रांसोबत गेली. तीन मित्र आणि दोन मैत्रिणी असे पाच जण बाहेर पडले. या पार्टीत तिनेही मद्यपान केले. घरी वेळेत पोहोचण्याचे बंधन नव्हते. रात्रीचे दोन वाजले. तिच्या मित्रांनी प्रथम एका मैत्रिणीला वाटेत घरी सोडले. अतिमद्यपानामुळे तिला कसलीच शुद्ध नव्हती. तिचे मित्र तिला इमारतीखाली सोडून निघून गेले. पण तिच्या त्या अवस्थेचा गैरफायदा घेत तिथलाच सुरक्षारक्षक प्रमोद उपाध्याय (३२) याने तिच्यावर इमारतीसमोरील रस्त्यावरच बलात्कार केला. त्यानंतर तिला तिच्या इमारतीच्या आवारात सोडून तो निघून गेला. ही तरुणी इतकी मद्यधुंद होती की, तिला आपल्या घरीही जाता आले नाही. जखमी अवस्थेत ती तिथेच पडून होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता कुत्र्यांना फिरविण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या तिच्या भावाला ती दिसली. त्याने तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे समजले. आपल्यावर कुणी बलात्कार केला हेदेखील या तरुणीला आठवत नाही, इतकी ती मद्याच्या अमलाखाली होती.
दुसरे म्हणजे घरातील तरुण महिला रात्रभर घरी आली नाही तरी तिला शोधण्यासाठी घरातून कोणीच काही प्रयत्न केले नाहीत, हे कितपत शहाणपणाचे मानायचे? याचाही विचार व्हायला हवा.
पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक केली. त्याचा गुन्हा गंभीर आहेच. त्याला शिक्षासुद्धा व्हायलाच हवी! पण, मद्यपान आपल्याला किती झेपेल याचे भान मुलींनीच काय मुलांनीही ठेवायला नको का? या घटनेत किमान सुरक्षारक्षकाला पकडता तरी आले. पण, बलात्कार करणारा कुणी अन्य असता तर त्याचा छडा लावणे पोलिसांना शक्य झाले नसते. नंतर बलात्कारी सापडत नाही म्हणून पोलिसांच्या नावाने शिमगाही झाला असता. पवईसारख्या प्रकरणातून मुलींनी धडा घ्यायला हवा, अशी अपेक्षा पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय. एल. जाधव यांनी व्यक्त केली.
इस्थर अनुया प्रकरणातला हलगर्जीपणा
हैदराबादची इस्थर अनुया (२३) ही अभियंता तरुणी मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत गेले वर्षभर काम करत होती. ती अंधेरीच्या वसतिगृहात राहात होती. नाताळच्या सुटीसाठी ती घरी गेली होती. ५ जानेवारीला ती मुंबईत परतली. एरवी दादर स्थानकात उतरणारी इस्थर नेहमीपेक्षा वेगळ्या गाडीने आल्याने ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’मध्ये उतरली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. १६ जानेवारीला तिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. हत्येपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात रिक्षा-टॅक्सीचालकांवर संशय असला तरी अद्याप तिचा मारेकरी सापडला नाही.
इस्थर वसतिगृहात राहत असली तरी तिचे येथे अनेक नातेवाईक आहेत. पहाटेस तिला एकटीने वसतिगृहात जावे लागेल, हे तिच्या पालकांच्या लक्षात आले नाही का? कुणी तरी रेल्वे स्थानकातून वसतिगृहात नेण्याची व्यवस्था करणे ही तिच्या पालकांची जबाबदारी नाही का? किमान तिला उजाडेपर्यंत रेल्वेच्या प्रतीक्षालयातच थांबण्याचा सल्ला तरी त्यांना देता आला असता, असे प्रश्न उपस्थित होतात.
सुरक्षारक्षकच भक्षक होण्याचा प्रकार तसा नवा नाही. ९ ऑगस्ट २०१२ रोजी वडाळ्यातील भक्तिपार्क वसाहतीत पल्लवी पुरकायस्था (२७) या तरुणीच्या हत्येबाबतही हेच घडले होते. पल्लवी मित्रासोबत राहात होती. घरात अन्य कुणी नसताना बलात्काराच्या उद्देशाने इमारतीचा सुरक्षारक्षक सज्जाद पठाण तिच्या घरात घुसला. त्याला पल्लवीने प्रतिकार करताच त्याने तिची हत्या केली. पल्लवी दारालगतच्या खुंटीवर चावी लावायची. हे सज्जादने पाहिले होते. सज्जाद तिच्या घरी गेला असता त्याने तिच्या नकळत चावी काढून घेतली होती. त्यामुळे मध्यरात्री त्याला तिच्या घरात सहजपणे प्रवेश करता आला. दाराला लागूनच खुंटीवर चावी अडकवणे हे किती धोकादायक आहे, याची नोंद सगळ्यांनीच घ्यायला हवी. मात्र सज्जादने नंतर पोलिसांकडे दिलेला जबाबही लक्षात घेण्यासारखा आहे. पल्लवी अनेकदा उत्तेजक कपडय़ांत फिरत असे. त्यामुळे मी बलात्काराचे धाडस केले, अशी कबुली सज्जादने दिली. ‘उत्तेजक कपडे’ या शब्दाची व्याख्या व्यक्ती, परिस्थिती यानुसार वेगवेगळी असू शकते. महिलांच्या पेहरावाबद्दल बोलल्यास ‘नैतिक पोलीसगिरी’चा आरोप नेहमीच होतो. परंतु ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन आदींसारख्यांसमोर आपण कोणत्या कपडय़ांत वावरावे याचे भान महिलांनी बाळगलेले बरे.
*‘उत्तेजक कपडे’ या शब्दाची व्याख्या व्यक्ती, परिस्थिती यानुसार वेगवेगळी असू शकते. महिलांच्या पेहरावाबद्दल बोलल्यास ‘नैतिक पोलीसगिरी’चा आरोप नेहमीच होतो. परंतु ड्रायव्हर, सुरक्षारक्षक, माळी, लिफ्टमन आदींसारख्यांसमोर आपण कोणत्या कपडय़ांत वावरावे याचे भान महिलांनी बाळगलेले बरे.
* तरुण महिला रात्रभर घरी आली नाही तरी तिला शोधण्यासाठी घरातून कोणीच काही प्रयत्न केले नाहीत, हे कितपत शहाणपणाचे मानायचे? याचाही विचार व्हायला हवा.