महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे बीद्रवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित नवी मुंबई पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनी नवी मुंबईकरांना दिली आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन करण्याचे हे व्रत सर्वानी पाळलेच पाहिजे. पोलीस दलाच्या बोधचिन्हात असलेला तळहाताचा पंजा सामान्य जनतेला अभय देणारा आहे. त्याचबरोबर समाजकंटकांवर कठोर कारवाई करणारादेखील आहे. पोलिसांनी दैनंदिन काम करताना ही जाणीव ठेवली पाहिजे, असा सल्ला त्यांनी कर्मचाऱ्यांना संदेशपत्राद्वारे देत, मरगळ आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.  
दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावण्याच्या घटना व इतर भुरटय़ा चोऱ्यांच्या प्रकाराकडे अधिक लक्ष पुरवणे आवश्यक आहे. या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासाला तडा जात आहे. या विरोधात कठोर कारवाई करणे अपेक्षित असून या देशात कायद्याचेच राज्य असल्याचा संदेश आपल्या वागणुकीतून स्पष्टपणे जाणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. समाजविरोधी कारवायांचे समूळ उच्चाटन आपण कर्तव्यकठोरतेने केले पाहिजे. महिलांचा अनैतिक व्यापार, नृत्य-मद्यपानगृहाच्या नावाखाली सुरू असलेले गैरव्यवहार, अमली पदार्थाचा व्यापार व इतर सामाजिक आणि आर्थिक गुन्ह्य़ांविरोधात कठोर कारवाई करताना, कोणत्याही प्रकारच्या मोहाला, प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडण्याची तंबी कर्मच्याऱ्यांना देत, ‘रक्षकच झाला भक्षक’ या दाहक टीकेला या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. पत्रातील या साध्या सूचना अमलात आणल्यास नवी मुंबईचे नागरिक तुमच्याकडे प्रेमाने व आदराने पाहतील. परिणामी, तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडताना आंनद आणि आत्मसन्मान वाढेल असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी उच्च प्रतीची नैतिक व शैक्षणिक पात्रता मिळवून एक चांगला माणूस बना. आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबीयांची योग्य काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्लादेखील त्यांनी दिला आहे. आयुक्तांच्या पत्रप्रपंचामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सध्या नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
नवीन पबसाठी पोलीस परवानगी नाही
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासोबतच शहराच्या सुरक्षततेसाठी योग्य त्या सर्व उपायोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद यांनी  सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पब आणि लेडिज बारमधील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यापुढे एकाही नवीन पबला पोलीस परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे बारवरदेखील पोलिसांची बारीक नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.