अमेरिकन फायनान्स असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा फिशर ब्लॅक पुरस्कार शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझिनेसमधील अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण विषयाचे प्राध्यापक आमिर सूफी यांना मिळाला आहे, नुकताच त्यांना तो प्रदान करण्यात आला. या संस्थेच्या प्राध्यापकास हा पुरस्कार मिळण्याची ही तिसरी वेळ. याआधी याच संस्थेचे प्राध्यापक व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. ‘घरांसाठीचे कर्ज व आर्थिक पेचप्रसंग’ या विषयावरील संशोधनासाठी सूफी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

चाळीस वर्षांखालील अर्थशास्त्रज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. तरुण अर्थतज्ज्ञांना संशोधनास प्रेरणा मिळावी हा फिशर पुरस्कारामागचा हेतू आहे. ज्या फिशर ब्लॅक यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते गोल्डमन सॅशचे माजी भागीदार होते व शिकागो बूथ स्कूल तसेच एमआयटीत प्राध्यापक होते. अर्थशास्त्रात मूलभूत संशोधन करणाऱ्यांना हा पुरस्कार  दिला जात आहे. सूफी यांनी महामंदी, ग्राहकांचा वस्तू वापर व अर्थशास्त्र यावर जे संशोधन केले त्याला केवळ चांगली प्रसिद्धी मिळाली. एवढेच नाही तर त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्ह, बँकिंग, गृहनिर्माण व शहर विकासावरील सिनेट समिती, व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार मंडळ यांना सादर करण्यात आले. त्यांनी अतिफ मियाँ यांच्यासमवेत ‘हाऊस ऑफ डेब्ट- हाऊ दे (अ‍ॅण्ड यू) कॉज्ड द ग्रेट रेसेशन अ‍ॅण्ड हाऊ वुई कॅन प्रिव्हेन्ट इट फ्रॉम हॅपनिंग अगेन’ हे पुस्तक लिहिले आहे. ते शिकागो विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. ‘फायनान्शियल टाइम्स’च्या यादीत २०१४ मध्ये उद्योग व अर्थशास्त्रातील सर्वोत्तम पुस्तक म्हणून ते नावाजले गेले होते. सूफी व मियाँ यांनी त्यांच्या ‘हाऊस ऑफ डेब्ट’ या पुस्तकात महामंदी व महामंदीसदृश स्थिती यांचा परिणाम घरकर्जाच्या दृष्टिकोनातून अभ्यासला आहे. युरोपातील आर्थिक पेचप्रसंगाचा उल्लेख त्यात आहे. जेव्हा घरकर्जे मोठय़ा प्रमाणावर घेतली जातात व नंतर मंदीसदृश स्थितीमुळे घरखरेदी खर्चात लोक हात आखडता घेतात तेव्हा त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास त्यांनी केला. अर्थात अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगाची डूब त्यांच्या संशोधनास आहे. त्यांनी कर्ज बाजारपेठा व त्यात घरकर्जाची भूमिका यावर विशेष लक्ष केंद्रित केले. बूथ स्कूलचे रघुराम राजन, टोबियास मोसकोवित्झ व आता सूफी अशा तिघांना हा पुरस्कार आतापर्यंत मिळाला आहे.

सूफी हे नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रीसर्च या संस्थेचे संशोधन सहायक आहेत. ‘अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्य़ू’ व ‘जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स’ या नियतकालिकांचे सहायक संपादकही आहेत. ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘द फायनान्शियल टाइम्स’, ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ यांनी त्यांच्या संशोधनाचा परामर्श घेतला आहे. सूफी यांनी जार्जटाऊन विद्यापीठाच्या वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सव्‍‌र्हिस या संस्थेतून अर्थशास्त्राची पदवी घेतली. नंतर त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून याच विषयात पीएच.डी. केली. नंतर २००५ मध्ये ते शिकागोच्या बूथ स्कूलमध्ये प्राध्यापक झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह या मध्यवर्ती बँकेत त्यांनी सहायक अर्थतज्ज्ञ म्हणूनही काम केले आहे.