हरियाणात, आजच्या पलवल जिल्ह्यातील हसनपूर येथे इब्न अब्दुर रहमान यांचा जन्म १९३० मध्ये झाला. बालपण तेथेच गेले आणि मॅट्रिकनंतर शिक्षणासाठी अलीगढ मुस्लीम विद्यापीठात गेले असता फाळणी झाली! अख्खे कुटुंब आधी दिल्लीला, मग लाहोरमध्ये आले. कळत्या वयात ‘चले जाव’ चळवळीपासून फाळणीपर्यंतच्या घडामोडी पाहिलेले, फाळणीकालीन दंग्यांमध्ये नातेवाईक गमावलेले रहमान सज्ञानवय होताहोता  पाकिस्तानी नागरिक बनले होते… फैज अहमद फैज यांच्यामुळे ते पत्रकारितेत आले आणि  जीना, भुत्तो, झिया अशा राजवटी पाहाव्या लागल्याने भारताशी अधिक चांगले संबंध राखायलाच हवे, ही जाणीव वाढत गेली. यातूनच त्यांनी ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी’ या मंचाच्या उभारणीत उभय देशांमधील अन्य २३ जणांप्रमाणेच पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या छुप्या लष्करशाहीविरुद्ध नेहमीच नाराजी व्यक्त करणाऱ्या या ‘भारतमित्र’ रेहमान यांचे निधन १२ एप्रिलरोजी अल्प आजारानंतर झाले.

पत्रकारितेत नाव कमावून रहमान १९८९ मध्ये ‘पाकिस्तान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाचे प्रमुख संपादक झाले. बेनझीर भुत्तो यांच्या पंतप्रधानपदाची पहिली कारकीर्द व त्यानंतरचे सत्तांतरही त्यांनी संपादक म्हणून पाहिले. मात्र पाकिस्तानचे नष्टचर्य काही संपत नाही, हेही ढळढळीत दिसू लागले होते. ही संपादकीय भूमिका मांडल्यामुळे, १९९३ मध्ये त्यांना संपादकपदावर पाणी सोडावे लागले. यानंतर समाजजीवनात ते पूर्णवेळ सक्रिय झाले. ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम…’ची स्थापना १९९४ मधील, परंतु ‘पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमिशन’ या बिगरसरकारी संस्थेतही ते कार्यरत झाले. या संस्थेतील कामासाठी त्यांना न्यूयॉर्कच्या ‘ह्यूमन राइट्स वॉच’ संस्थेचा पुरस्कार मिळाला होता, तर दक्षिण आशियाई शांतता व लोकशाही यांसाठी त्यांनी केलेल्या कामाचा गौरव २००४ मध्ये ‘मॅगसेसे पुरस्कारा’ने झाला होता.

‘अण्वस्त्रमुक्त दक्षिण आशिया’ या मोहिमेतही त्यांनी पुढाकार घेतला. भारताने १९९८ मध्ये दुसऱ्यांदा चाचणी अणुस्फोट घडविल्यानंतर ‘पाकिस्तानने वेडपट अण्वस्त्रस्पर्धा सोडावी’ असे जाहीर आवाहन करण्यासाठी भारताशी १९६२ वा १९७१च्या युद्धांत कार्यरत असलेल्या निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीही पुढे यावे, यासाठी रहमान यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यशही आले. भारतीय वृत्तसंकेतस्थळांवर त्यांनी अलीकडे लिहिलेल्या लेखांतून, इम्रान खान राजवट लष्कराच्याच कचाट्यात असल्याची स्पष्टोक्ती होती. त्यांच्या निधनाने भारत-पाकिस्तान लोक-संवादाचा सच्चा पाठीराखा हरपला आहे.