04 March 2021

News Flash

जयंत सावरकर

आपल्या छोटय़ाशा भूमिकेतही सगळ्यांच्या नजरांचा ठहराव मिळवणे, हीही सोपी गोष्ट नव्हे.

जयंत सावरकर

रंगभूमीवर पदार्पण करणाऱ्या प्रत्येकास मुख्य भूमिका वाटय़ाला येण्याचे स्वप्न असते. तोंडाला रंग फासून त्या भूमिकेत शिरणाऱ्या प्रत्येक अभिनेत्यास मग आजूबाजूचे जग दिसत नाही. रंगभूमीवर आपले अस्तित्व उजळून टाकण्यासाठी कायिक, वाचिक अभिनयाबरोबरच अनेक गुणांची उधळण करीत अभिनेता किंवा अभिनेत्री आपले सारे आयुष्य पणाला लावत असते, हे खरे. परंतु रंगमंचावर पदार्पण करताच दाद मिळणाऱ्या सहकलाकारांचे मोल त्यामुळे अजिबातच कमी होत नाही. आपल्या छोटय़ाशा भूमिकेतही सगळ्यांच्या नजरांचा ठहराव मिळवणे, हीही सोपी गोष्ट नव्हे. जयंत सावरकर हे अशा नटांपैकी एक. रंगभूमीवर सहा दशके वावरताना समोरच्या रसिकांना त्या भूमिकेत गुंतवून ठेवण्याची किमया सावरकर यांच्याकडे आहे. त्यांच्या रंगमंचीय कारकिर्दीची चुणूक त्यांच्या मोठय़ा भूमिकांतून जशी दिसते, तशीच त्यांनी केलेल्या छोटय़ा भूमिकांतूनही. कलावंत नाटक संपल्यानंतरही लक्षात राहणे, ही खरी पावती. ती सावरकर यांना अनेकदा मिळाली आहे.

रंगभूमी आणि दूरचित्रवाणी या माध्यमांतून ते घरोघरी पोहोचले आणि आपल्या घरातीलच कुणी जवळचे वाटावे, असे सगळ्यांच्या हृदयात शिरले. त्यांच्या या कलागुणांमुळे सगळ्या रसिकांनी मनोमन अनेकदा त्यांना सलाम केला आहे. आता तो जाहीरपणे मिळणार आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक असलेल्या विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार यंदा सावरकर यांना जाहीर झाला आहे आणि तो त्यांच्या कलेचा मोठा सन्मान म्हटला पाहिजे. विजया मेहता, दामू केंकरे यांच्यासारख्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रंगभूमीवर वावरता आले आणि ‘लिटिल थिएटर’ या सुधा करमरकर यांच्या बालनाटय़ चळवळीतही ते काम करू शकले. आजही रंगभूमीवरील कलाकारांसाठी दंतकथा बनून राहिलेल्या केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना मिळाले. पण ते ज्या काळात रंगभूमीवर वावरले, त्यातील सगळ्या बदलांचे ते सक्रिय साक्षीदार राहिले आहेत. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी आणि मंगेश कदम यांच्या दिग्दर्शनाखालीही सावरकर रंगमंचावर अवतरले. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, व्यक्ती आणि वल्ली, तुझे आहे तुजपाशी, ययाति आणि देवयानी, एकच प्याला अशा विविधरंगी नाटकांमधून जयंत सावरकर अतिशय आत्मविश्वासाने वावरले. त्यांच्या भूमिकांना रसिकांनीही भरभरून दाद दिली. दूरचित्रवाणी या माध्यमातही त्यांनी आपली छाप उमटवली, याचे एक कारण असे असू शकेल, की विश्राम बेडेकर यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर काही काळ त्यांना सहायक म्हणून काम करायची संधी मिळाली. कलावंताला मिळणारा असा पुरस्कार त्याचे कलात्मक आयुष्य आणखी टवटवीत करण्यास उपयोगी ठरतो. सावरकर यांनी आयुष्यभर केलेल्या भूमिकांना मिळालेली ही दाद म्हणूनच अधिक महत्त्वाची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:15 am

Web Title: jayant savarkar
Next Stories
1 विजय नारकर
2 डॉ. रजनीश कुमार
3 राम एकबाल सिंह
Just Now!
X