एकेकाळी मुंबईतील नाटय़सृष्टीचे केंद्र असलेल्या गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रांगणात ज्यांचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये अशा ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे नुकत्याच दिवंगत झाल्या. त्यांचे वडील तात्या आमोणकर हे साहित्य संघाचे तत्कालीन सर्वेसर्वा (सीनियर) डॉ. भालेराव यांचे उजवे हात. साहजिकच त्यांच्या दोन्ही कन्यांना- ललिता आणि सुधा (करमरकर) यांना- साहित्य संघात मुक्तद्वार होते. नाटकाचे बाळकडू असे घरातच मिळाल्याने दोघींचे नाटकात जाणे स्वाभाविक होते. त्यांनी पं. गोविंदराव अग्नींकडे संगीताचे आणि गुरू पार्वतीकुमारांकडे नृत्याचे धडे गिरवले. पार्श्वनाथ आळतेकरांसारख्या ख्यातनाम प्रशिक्षकांनी त्यांना अभिनयातले बारकावे शिकविले. उत्तम रूपसंपदा लाभलेल्या ललिताबाईंना नाटकांत पदार्पणाकरता म्हणूनच कष्ट पडले नाहीत. साहित्य संघ, ललितकलादर्श, धि गोवा हिंदु असोसिएशन तसेच बाळ कोल्हटकरांच्या नाटकांतून  त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्या एकपाठी असल्याने नाटकातील संवाद लगेचच आत्मगत करू शकत. त्यामुळे एखाद्या नाटकामधील स्त्री-कलावंतास काही कारणांनी प्रयोगात काम करणे शक्य नसल्यास अनेकदा ऐनवेळी  ललिताबाईंना पाचारण केले जाई आणि त्याही लीलया ती भूमिका साकारीत. ‘सं. कान्होपात्रा’ नाटकाच्या अशाच एका सार्वजनिक उत्सवातील प्रयोगात आयत्या वेळी उभ्या राहिलेल्या ललिताबाईंनी इतकी सहजसुंदर भूमिका साकारली, की या नाटकातील अरविंद पिळगावकरांसारखे जाणते कलावंतही त्याने थक्क झाले होते.  गायन व नृत्याचे अंग असल्याने अनेक संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्यातही ‘पंडितराज जगन्नाथ’मधील त्यांचे स्वत: गाऊन नृत्य करण्याचे कौशल्य रसिकांची दाद मिळवून गेले होते. ‘पती गेले गं काठेवाडी’मधील त्यांची प्रमुख भूमिकाही खूप गाजली. त्यांना विनोदाची उत्तम जाण होती. त्याकाळी स्त्री-कलाकारांकरता खास विनोदी भूमिका निर्माण करण्याची पद्धत नसतानादेखील ललिताबाईंनी विनोदी भूमिकाही उत्तम साकारल्या. सई परांजपे यांच्या ‘कथा’मधील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. पुढे रंगकर्मी दामू केंकरे यांच्याशी लग्न केल्यावर त्या अधिककरून संसारातच रमल्या. दामू केंकरे हे मनस्वी व सुशेगात कलावंत होते. त्यामुळे संसारातील व्यावहारिक बाजू ललिताबाईंनी आपल्या शिरावर घेतली आणि ती चोखपणे पार पाडली. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्या रंगभूमीपासून दुरावल्या. परंतु याची त्यांना खंत नव्हती. बहीण सुधा करमरकर यांच्यासारख्या त्या कलावंत म्हणून महत्त्वाकांक्षी नव्हत्या. कलानगरमधील त्यांच्या घरात अनेक नाटकांच्या तालमी होत. त्यातून त्या नाटकाशी दुरून का होईना, जोडलेल्या राहिल्या. एक समाधानी कलावंत म्हणून त्यांनी उर्वरित आयुष्य व्यतीत केले.