News Flash

अ‍ॅडम वेस्ट

डी. सी. कॉमिक्सने जन्म दिलेल्या बॅटमॅन या मानवीय सुपरहिरोचे महत्त्व आपल्या लेखी मनोरंजक व्यक्तिरेखा आहे.

दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगावर दाटले असताना १९३९ साली डी. सी. कॉमिक्सने जन्म दिलेल्या बॅटमॅन या मानवीय सुपरहिरोचे महत्त्व आपल्या लेखी मनोरंजक व्यक्तिरेखा आहे. अमेरिकेसाठी मात्र ते तसे नाही. आपल्याला जशी रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांतील सहस्रगुणांच्या नायकांचे महत्त्व तसेच काहीसे तिथे बॅटमॅनचे. इतकी त्याची पराक्रमांची पत महत्त्वाची. गॉथम नावाच्या कल्पित शहरातील गुन्हेदराच्या उत्कलन बिंदूमध्ये त्याची निर्मिती झाली. अब्जाधीश आई-वडिलांची हत्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहणाऱ्या एका पापभीरू मुलातून खलप्रवृत्तींना नेस्तनाबूत करणारा जननायक अशी प्रतिमा या कॉमिक्स कथनातून वाढत गेली. १९६०च्या अमेरिकी समाजजीवन उत्क्रांतीच्या टप्प्यात जेव्हा एक पिढी कुटुंबविघटनाच्या जबडय़ातून जात होती त्याच वेळी तिचा तडाखा थेट बसलेली नवी पिढी टीव्हीवर दिसणाऱ्या सुपरहिरोंना आपल्या दु:खांचे औषध म्हणून पाहत होती. या औषधांपैकीच एक बॅटमॅनरूपी ‘अ‍ॅडम वेस्ट’ होते. बॅटमॅन याचे कॉमिक्समधून चित्रपटातील रूपांतरे गाजायच्या आधी ती टीव्हीवर गाजली.  अ‍ॅडम वेस्ट यांच्या रूपाने ती पहिल्यांदा छोटय़ा पडद्यावर आली.

विल्यम वेस्ट अ‍ॅण्डरसन या नावाने १९२८ साली वॉशिंग्टनमधील शहरगावात जन्मलेल्या वेस्ट यांनी साहित्यात पदवी मिळविली, पण तत्कालीन पत्रकारिता आणि युद्धोत्तर नवसाहित्याच्या प्रांतात शिरण्याऐवजी वेस्ट यांनी हॉलीवूड गाठून आपल्या नावात बदल केला. अ‍ॅडम वेस्ट हे नायकाला साजेसे नाव घेऊन हॉलीवूडचे स्टुडिओज गाठले. छोटुकल्या भूमिकांनी सात वर्षे ‘स्ट्र’ म्हणजेच स्ट्रगलिंगची अवस्था संपल्यानंतर त्यांच्याकडे ब्रूस वेन म्हणजेच बॅटमॅन या सुपरहिरोची भूमिका आली. हा ब्रूस वेन इतका गाजला की, घराघरांमध्ये तरुण वर्ग या मालिकांची पारायणे करू लागला. रांगडा तरी नम्रविनोदी आणि आपला पोशाख चढविला की निगरगट्ट खलनायकांच्या मुसक्या आवळण्याची क्षमता असणारा गॉथम सिटीमधील पीडितांचा तारणहार म्हणून अ‍ॅडम वेस्टकडे पाहिले गेले. १९६६ ते ६८ या काळामध्ये अ‍ॅडम वेस्ट हे लौकिकार्थाने पडद्यावर बॅटमन म्हणून समोर आले आणि नुकत्याच झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत बॅटमन म्हणूनच जगले. बॅटमॅनवर दरएक दशकामध्ये भले-बुरे चित्रपट आले. टिम बर्टनच्या बॉक्स ऑफिस गाजविणाऱ्या चित्रपटापासून जोएल शुमाकरच्या तद्दन वाईट अवतारापर्यंत अ‍ॅडम वेस्टसारखा बॅटमॅन कुणीही साकारू शकले नाही. पुढे ख्रिस्तोफर नोलानने या चित्रमालिकेचा जीर्णोद्धार करून बॅटमॅन आणि त्याच्या अवतीभवतीच्या जगाला आणखी उत्कट स्वरूपात मांडले, पण या सर्व बॅटमॅन चित्रकर्त्यांनी आदर्श बॅटमॅन म्हणून अ‍ॅडम वेस्ट यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेकडे पाहिले. युद्धोत्तर नैराश्याची आणि सिनेमांत प्रयोगांची असोशी वाढलेली होती. १९६०च्या दशकात व्यक्तिवादी अतिरेकाच्या सोसातून सर्वसामान्य व्यक्तींचा आणि विशेष करून कुटुंबातील लहान मुलांचा एकटेपणा वाढला होता. त्या एकटेपणाला अ‍ॅडम वेस्टच्या बॅटमॅनने सावरल्याचे आजच्या अनेक चित्रपट दिग्दर्शकांनी गेल्या आठवडय़ामध्ये कबूल केले. या मालिकेनंतर वेस्ट यांनी मुख्य धारेतल्या चित्रपटांमध्ये काम केले. पुन्हा टीव्ही मालिकाही गाजविल्या, मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्या आजाराशीही कित्येक वर्षे सुपरहिरोसारखाच लढा दिला. म्हणून मृत्यूपश्चात त्यांच्या बॅटमॅनकालीन स्मृतींना मोल निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:18 am

Web Title: loksatta vyakti vedh adam west
Next Stories
1 गिरीश वाघ
2 प्रा. गोपाळ दुखंडे
3 सी. नारायण रेड्डी
Just Now!
X