आपल्याला खरे तर चित्रपट प्रमाणन मंडळाची गरजच असू नये, पण सध्या तरी तेवढी उंची आपल्या समाजाने गाठलेली नाही, असे म्हणणारे गीतकार, जाहिरात गुरू व सर्जनशील पटकथा लेखक असलेले प्रसून जोशी आता भारतीय चित्रपट प्रमाणन (अभ्यवेक्षण) मंडळाचे अध्यक्ष झाले आहेत. प्रत्यक्ष पदावर आल्यानंतर त्यांना त्यांच्याच वक्तव्यांची पाठराखण करण्याची कसोटी पार पाडावी लागणार आहे. प्रेक्षकांनीच जर अभिरुचीहीन गाणी किंवा अन्य बाबी नाकारल्या तर कात्री लावण्याची वेळ येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आता चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनाही यात भूमिका पार पाडावी लागणार आहे.

पहलाज निहलानी यांनी ‘उडता पंजाब’, ‘दी जंगल बुक’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘स्पेक्टर’ अशा अनेक चित्रपटांप्रकरणी हेकेखोर भूमिका घेतल्याने त्यांना जावे लागले. आता चित्रपट उद्योग व समाजातून आपल्या निर्णयांवर टीका होणार नाही, याची जबाबदारी प्रसून जोशी यांना घ्यावी लागणार आहे. प्रसून जोशी यांचा जन्म उत्तराखंडमधील अल्मोडा भागातील जाखनदेवी भागात झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात एमएस्सी केल्यानंतर गाझियाबादमधून एमबीए पदवी घेतली. त्याआधी वयाच्या सतराव्या वर्षांपासूनच ते काव्यलेखनाकडे वळले होते. पर्वतीय प्रदेशातील असल्याने त्यांच्या काव्याला नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्यांच्या कवितांचे जे चाहते आहेत, त्यात माजी पंतप्रधान वाजपेयी यांचेही नाव घ्यावे लागेल. कारण ‘इरादे नये भारत के’ ही प्रसून यांची कविता अटलजींनी त्यांच्या भाषणात अनेकदा साभिनय सादर केली होती.

१९९२ मध्ये प्रसून जाहिरात क्षेत्रात आले. १९९६ मध्ये त्यांचा ‘अब के सावन’ हा पहिला अल्बम आला. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले. ‘तारे जमीं पर’, ‘रंग दे बसंती’, ‘फना’, ‘ग़जनी’ यांसह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. अनेक चित्रपटांतील गाणी, संवाद व पटकथा त्यांनी लिहिल्या आहेत. एमबीए केल्यानंतर ते एका छोटय़ा कंपनीत नोकरी करीत होते, तेथून ते मैकेन एरिक्सन कंपनीत आले. नंतर राजकुमार संतोषी यांच्या ‘लज्जा’ चित्रपटाने त्यांना फिल्मी दुनिया खुली झाली. त्यांना दोनदा सवरेत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला असून २०१५ मध्ये साहित्य, कला क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री सन्मान मिळाला आहे. ‘ठंडा मतलब कोकाकोला’ व ‘बार्बर शॉप-ए जा बाल कटा ला’ या जाहिरातींनी त्यांना विशेष नाव मिळाले. ‘भोपाळ एक्स्प्रेस’ या चित्रपटासाठी गीत लेखनाचा प्रस्ताव महेश मथाई यांनी त्यांच्यासमोर ठेवला. त्यात त्यांनी काव्य व संवादाची गुंफण करून साकारलेल्या पंक्ती अमिताभ बच्चन यांनी स्वरसाज दिल्याने जास्तच उजळल्या होत्या. ‘अतिथी देवो भव’ ही जाहिरात मोहीम मॅकेन एरिक्सन कंपनीचीच होती. मोदी यांच्या २०१४ मधील प्रचार मोहिमेच्या वेळी ‘सौगंध’ हे गीत त्यांनी लिहिले होते व ते मोदी यांनी स्वत: सादर केले होते.

२००९ मध्ये अडवाणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना प्रसून जोशी यांनी ‘मजबूत नेता निर्णायक सरकार’ ही जाहिरात केली होती. केंद्रीय मंत्री अरुण जेटली, स्मृती इराणी यांच्या निकटच्या वर्तुळात ते आहेत. एकदा सनी लिओनीची दूरचित्रवाणी वाहिनीवर मुलाखत झाली होती, त्या वेळी सर्व चित्रपट उद्योग तिला पाठिंबा देत असताना प्रसून जोशी यांनी तिच्या पूर्वव्यवसायाच्या निवडीवर आक्षेप घेतला होता, असे काही पूर्वानुभव व भाजपशी असलेले संबंध बघता ते कितपत स्वतंत्रपणे काम करू शकतात, यातच त्यांच्या कारकीर्दीचे यश दडलेले असेल.