भारतीय वस्त्रकलेला पाश्चिमात्य जगाचे अधिष्ठान मिळवून देणाऱ्या फॅशन डिझायनरपैकी आघाडीचे नाव मनीष अरोरा. त्यांना नुकतेच ‘लीजन ऑफ ऑनर’ या फ्रान्समधील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांची डिझाइन्स जगभरातील तब्बल १८ देशांतील १०० हून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध असतात. पॅरिसमध्ये त्यांचे स्वतंत्र दालन (सिग्नेचर स्टोअर) आहे. वॉल्ट डिस्ने, बार्बी, स्वारोस्की, स्वॉच, रिबॉक, निव्हिया, मोनो पिक्स आदी बडय़ा विदेशी ब्रॅण्ड्सबरोबर अरोरा यांनी काम केले आहे.
मनीष अरोरा या दिल्लीस्थित पंजाबी डिझायनरचे बालपण मुंबईत सर्वसामान्य घरात गेले. कलेची आवड असूनही मध्यमवर्गीय मानसिकतेतून वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला, पण लवकरच त्यांना आपली आतली आवड साद घालू लागली आणि त्यांनी ‘दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझायनिंग’ची प्रवेश परीक्षा दिली. १९९४ मध्ये तिथून उत्तीर्ण होताना ते सर्वोत्तम विद्यार्थ्यांचा पुरस्कार घेऊनच बाहेर पडले.
तो देशातील फॅशन उद्योग जन्माला यायचा काळ होता. तरीही पॅरिस, मिलान, लंडन या फॅशनप्रेमी शहरांत होतात तसे रीतसर फॅशन वीक सुरू व्हायला आपल्या देशात २००० साल उजाडावे लागले. मनीष अरोरा यांची घोडदौड त्याअगोदरच सुरू झालेली होती. १९९७ मध्येच त्यांनी स्वतचे फॅशन लेबल सुरू केले आणि परदेशातील फॅशन शोमध्ये हे भारतीय नाव गाजू लागले. पॅरिस फॅशन वीकमध्ये २००७ मध्ये त्यांनी सादर केलेली डिझाइन्स बरीच गाजली आणि फॅशनच्या राजधानीत मनीष अरोरा हे नाव सन्मानाने घेतले जाऊ लागले. त्यातूनच केटी पेरी, लेडी गागा आदी वलयांकित व्यक्तिमत्त्वांना मनीष अरोरांची डिझाइन्स मिरवावीशी वाटली. केवळ रॅम्पवरचे कपडेच नाही, तर घडय़ाळे, बॅगा, चष्मे, बाहुल्या आदी उत्पादनांसाठीही अरोरा यांनी काम केले.
भारतीय संस्कृती ही माझ्या डिझाइन्सची प्रेरणा आहे, असे अरोरा सांगतात, तरीही त्यांनी पारंपरिक भारतीय पद्धतीचा पेहराव आपल्या डिझाइन्समध्ये सुरुवातीला थेटपणे वापरलेला नाही. अगदी अलीकडे त्यांचे ‘इंडियन’ नावाचे कलेक्शन ‘बिबा’ या भारतीय ब्रॅण्डसोबत बाजारात आले. पाश्चिमात्य डिझायनर्सपेक्षाही त्यांचे कपडे वेगळे वाटतात, कारण त्याचा आत्मा भारतीय असतो. मनीष अरोरांची डिझाइन्स विदेशात लोकप्रिय होण्याचे हेच कारण असावे. रंगांचा मुबलक पण कलात्मक वापर हे त्यांच्या डिझाइन्सचे वैशिष्टय़. कला-विज्ञान-व्यापार आदी क्षेत्रांत फ्रान्सला मोठे करणाऱ्या फ्रान्सच्या नागरिकांना आणि परदेशी नागरिकांनाही हे ‘लीजन ऑफ ऑनर’ देऊन गौरवण्यात येते. जे. आर. डी. टाटा, पंडित रविशंकर, अमिताभ बच्चन आदी दिग्गजांना हा सन्मान याअगोदर मिळाला आहे. अरोरा यांची यथोचित दखल भारतात सरकारी पातळीवर मात्र अजून घेतली गेलेली नाही.