कुशाग्र बुद्धी, चिकित्सक वृत्ती, वास्तववादी विचार आणि दातृत्व या गुणांचा समुच्चय पंडितराव कुलकर्णी यांच्या अंगी होता. यामुळेच राज्यातीलच नव्हे तर देशातील उद्यम जगतात ‘पंडितकाका’ हे नाव सर्वश्रुत झाले. त्यांच्या ‘फाय’ उद्योगाची उत्पादने जगभरच्या बाजारपेठेत मानाने विकली गेली. इचलकरंजी संस्थान जागीरदार नारायणराव घोरपडे यांनी लोकमान्य टिळकांच्या सल्ल्याने उद्योगाचे बीजारोपण केले आणि १९०४ साली पहिला यंत्रमाग कारखाना सुरू झाला. यंत्रमाग-क्षेत्र वाढत असतानाच, इचलकरंजीला अभियांत्रिकी क्षेत्रात लौकिक मिळवून देण्याचे काम कुलकर्णी बंधूंनी केले. थोरले बंधू यंत्रमहर्षी शंकरराव दाजी कुलकर्णी यांनी टाटांच्याही आधी ५० वर्षांपूर्वी देशातील पहिली ‘मीरा’ मोटार बनवली, तर पंडितकाका यांनी ‘कुल्को’ उद्योगाद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश केला. वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी यंत्रे, कार वॉशिंग अशी त्यांची उत्पादने जगभर गाजली. आधुनिक पायाभूत सुविधा, अत्युच्च दर्जा व अनुभवी कर्मचारी यांमुळे ‘फाय’ने विकसित केलेली यंत्रसामग्री आणि घटक उत्पादन तंत्रज्ञान, सॉफ्टवेअरमधील जागतिक दर्जेदारपणा हा त्यांच्या उत्पादनाचा अविभाज्य घटक होता. म्हणूनच जपान मधील ‘केहीन’ सारख्या प्रख्यात कंपनीने भारतात उद्योग सुरू  करायचे ठरवले तेव्हा महानगरातील कंपन्यांऐवजी इचलकरंजीसारख्या शहरातील फाय उद्योगाची निवड केली. दुचाकीसाठी लागणारे काबरेरेटर बनवणे ही फाय तसेच इचलकरंजीच्या अभियांत्रिकी उद्योगाची ओळख बनली. या कामाचा विस्तार व्हावा याकरिता त्यांनी अनेक लघुउद्योगांना मदतीचा हात देऊन मोठे केले.  कमालीचे वास्तववादी, परखड वृत्तीचे पंडितकाका गप्पांच्या फडात हास्याची कारंजी उडवत. गुणवंतांची कदर हा त्यांचा स्वभावाचा आणखी एक विलक्षण कंगोरा. त्यांनी फाय पुरस्कार सुरू केला. यातील सर्वोच्च ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ टी. एन. शेषन, जॉर्ज फर्नाडिस, जयंत नारळीकर, शंतनुराव किलरेस्कर, डॉ. राजा रामण्णा, रूसी मोदी, लता मंगेशकर, रतन टाटा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी आदींना मिळाला आहे. इचलकरंजीत झालेल्या (५०व्या) अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील त्यांचा सहभाग मोठा होता.  कोटय़वधी रुपयांची उलाढाल असतानाही त्यांच्या अंगावर नेहमी खादीची वस्त्रे असत. इचलकरंजीसारख्या गावाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पंडितकाकांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद तर होतेच, परंतु त्यांच्या अस्तित्वाने हातमाग -यंत्रमागाच्या या शहराला एक वेगळी ओळखही मिळाली. नगराध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या निधनाने एक  कल्पक उद्योजक काळाच्या पडद्याआड गेला आहे.