अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये मानद प्राध्यापक असताना भारत हीच कर्मभूमी मानणारे शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचे सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व त्यांच्यासह काम करणाऱ्या सर्वानाच सदैव स्मरणात राहावे असेच होते. चित्रे हे खगोलभौतिकशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते, पण त्यांचा मुख्य विषय सौर भौतिकशास्त्र व गुरुत्वीय भिंगांवरचे संशोधन. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील प्राध्यापकपदावरून २००१ मध्ये निवृत्त झाले. अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष, होमी भाभा विद्यावृत्ती मंडळाचे ते मानद कार्यकारी संचालक ही पदेही त्यांनी भूषवली होती. त्यांना पद्मभूषण किताबाने २०१२ मध्ये गौरवण्यात आले होते. वागण्यात कुठलाही अभिनिवेश नसल्याने, चहापानावेळी सहज गप्पांमध्ये त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना बरेच ज्ञानसंचित मिळत असे. एका विचारी बुद्धिवंताची ही साथ आता कायमची संपली आहे. चित्रे यांचा जन्म १९३६ मधला, पार्ले टिळक विद्यालय व किंग जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये ते शिकले. एल्फिन्स्टन कॉलेज व रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थांतून उच्चशिक्षण घेतले. गणितात पदवी घेतली होती, त्यामुळेच ते खगोलभौतिकीत लीलया संचार करू शकले. गणितज्ञ पी. आर. मसानी हे एल्फिन्सटनमध्ये गणिताची संस्था चालवीत; त्यांची प्रेरणा चित्रे यांना होती. केंब्रिजच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी गणितातील ट्रायपॉस अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर ते सौरडागांकडे वळले. त्यांचे नंतरचे शिक्षण चर्चिल कॉलेजमधून झाले. केंब्रिजमध्य ते व प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांची कार्यालये शेजारी होती. हॉकिंग यांनी चित्रे यांना क्रॉकेटचा खेळ शिकवला. गतवर्षी नोबेल मिळालेले रॉजर पेनरोज व चित्रे केंब्रिजला एकाच वर्गात होते. नंतर चित्रे लीडस विद्यापीठात प्राध्यापक झाले, त्या वेळी त्यांची इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ थॉमस जी. कोलिंग यांच्याशी ओळख झाली. ते चुंबक व जलगतिकी, सौर भौतिकशास्त्राचा अभ्यास एकत्र करीत असत. चित्रे यांना शिकागोचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करायचे होते पण तसे झाले नाही. नंतर चित्रे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (कालटेक) या संस्थेत आले व त्यांनी अणुशास्त्रज्ञ विल्यम ए. फाउलर व सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ किप थोर्न यांच्यासह न्यूट्रॉन ताऱ्यांवर काम केले. तेथून १९६७ मध्ये देशप्रेमापोटी ते मायदेशी परतले आणि येथे राहूनच अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांनी मिळवले. सौर चुंबकीय चक्र, सौर वातावरणातील उदासीन कण, सौर डायनॅमो सिद्धांत व आयन सौर डागांचे रंग यावर त्यांनी काम केले. कलिना येथे अणुऊर्जा संशोधन केंद्र उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नेहरू तारांगणातील पहिल्या सायन्स शोची कल्पना त्यांची होती. त्यांच्या निधनाने विज्ञान शिक्षण, संशोधन, धोरण या क्षेत्रातील प्रकाशमान तारा निखळला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2021 रोजी प्रकाशित
शशिकुमार चित्रे
नेहरू तारांगणातील पहिल्या सायन्स शोची कल्पना त्यांची होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-01-2021 at 01:49 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned astrophysicist professor shashikumar madhusudan chitre profile zws