अमेरिकेतील सत्तर-ऐंशीच्या दशकात अमेरिकेत ज्या रॉक बॅण्डची चलती होती, त्यात ‘द कार्स’चे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. अमेरिकेत तेव्हा आधीच्या रॉक बॅण्ड शैलींना नाकारणाऱ्या ‘पंक रॉक’चा उदय होऊ लागला होता. ‘द कार्स’ हा त्यापैकीच एक. तोवर प्रामुख्याने गिटारकेंद्री असलेल्या रॉक बॅण्ड संगीताची ‘द कार्स’ या बॅण्डने नव्या सिंथेसायजर या वाद्याशी मेळ घडवून आणला. सत्तरच्या दशकाच्या मध्यास सुरू झालेल्या या ‘द कार्स’ने कर्कशता टाळून लयबद्ध आणि मुख्य म्हणजे उपहास व युरोपीय संस्कृतीचे संदर्भ पेरलेल्या गीत-संगीताने अल्पावधीतच अमेरिकीच नव्हे, तर अमेरिकेबाहेरच्याही रसिकांच्या मनावर चांगलेच गारूड केले होते. हे सारे घडवून आणण्यात ‘द कार्स’चे गीतकार-गायक रिक ओकासेक यांचा वाटा महत्त्वाचा होता. सोमवारी त्यांच्या निधनाची वार्ता आल्यावर रॉक बॅण्ड संगीतरसिकांच्या मन:पटलावर सत्तर-ऐंशीच्या दशकांतील त्या प्रचंड उलथापालथीचे संदर्भ पुन्हा उमटले असतील.

अमेरिकेच्या मॅरीलँड प्रांतात १९४४ साली रिक ओकासेक यांचा जन्म झाला. वडील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेत कार्यरत होते. त्यामुळे रिक यांच्याकडूनही तशाच शैक्षणिक यशाची अपेक्षा असणे स्वाभाविक होते. परंतु रिक यांचा कल संगीताकडे असल्याने, काही काळ विद्यापीठीय शिक्षणात घालवून ते संगीतसाधनेकडे वळले. लवकरच ‘द कार्स’मध्ये त्यांचे सहकारी असलेल्या गायक बेंजामिन ओर यांच्याशी त्यांची भेट झाली. दोघांचे सूर जुळले. काही वर्षे दोघांनी विविध बॅण्ड्समध्ये उमेदवारी केली आणि अखेर आणखी काही सहकाऱ्यांसह १९७६ साली ‘द कार्स’ या रॉक बॅण्डची निर्मिती केली. तिथून पुढचे दीड दशक या बॅण्डने गाजवले. ‘द कार्स’, ‘कॅण्डी-ओ’, ‘पॅनोरामा’, ‘शेक इट अप’, ‘हार्टबीट सिटी’ आदी त्यांचे अल्बम लोकप्रिय ठरले. त्यातील काही अपवाद वगळता सर्वच गाणी रिक ओकासेक यांनीच लिहिली होती. त्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ विखुरलेले आहेत, हे रिक यांनीच पुढे एका मुलाखतीत सांगितले होते. रिक यांनी स्वतंत्रपणेही काही संगीत-प्रकल्प केले. कविता लिहिल्या. चित्रपटांत कामे केली. सर्जनशीलतेची त्यांची ही तपश्चर्या वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेईपर्यंत कायम होती.