05 August 2020

News Flash

डॉ. मो. गो. धडफळे

१९३७ साली जन्मलेल्या डॉ. मो. गो. धडफळे यांनी संस्कृत आणि पालि या भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

डॉ. मो. गो. धडफळे

‘‘धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर बौद्धसाहित्यावर प्रामाणिक लेखन करणारा लेखक’’ अशा शब्दांत खुद्द विदुषी दुर्गा भागवत यांनी ज्यांच्या संशोधनकार्याला पोचपावती दिली, ते संस्कृत व पालि भाषेचे आणि भारतविद्येचे (इण्डोलॉजी) अभ्यासक-संशोधक डॉ. मोहन गोविंद धडफळे यांची निधनवार्ता गत आठवडय़ात आली आणि महाराष्ट्रीय संशोधनविश्वातील महत्त्वाचा अभ्यासक हरपल्याची भावना अकादमिक वर्तुळातून व्यक्त झाली.

१९३७ साली जन्मलेल्या डॉ. मो. गो. धडफळे यांनी संस्कृत आणि पालि या भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे त्रिपिटकातील, म्हणजे गौतम बुद्धांच्या वचनांचा संग्रह असणारे तीन खंड- सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक यांच्यातील भाषिक रचनेबद्दल संशोधन करून त्यावरील पीएच.डी. प्रबंधही त्यांनी पूर्ण केला. हे सारे साठच्या दशकाआधीचे. त्यानंतर गतशतक संपेपर्यंत- तब्बल चार दशके त्यांनी संस्कृत आणि पालि या भाषांचे अध्यापन केले. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाबरोबरच पुढे पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात या भाषांचे अध्यापन-मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. धडफळे यांना प्रचंड विद्यार्थीप्रियता लाभली; याचे कारण त्यांच्या सहजशैलीत आहे. विद्वत्तेची ताठरता न आणता, सोप्या पद्धतीने विषय मांडण्यात, तुलनात्मक विचार करण्यात त्यांची हातोटी होती.

तीच त्यांच्या संशोधनपर लेखनातही दिसते. दुर्गाबाईंनी कौतुक केलेला डॉ. धडफळे यांचा ‘गौतमबुद्ध : एक लोकशिक्षक’ हा दीर्घ लेख असो किंवा ‘पालिभाषेतील बौद्धसंतसाहित्य’ हे त्यांचे संशोधनपर लेखांचे पुस्तक असो; पालि भाषेबद्दल आणि त्याशी जोडलेल्या बौद्ध साहित्य व जीवनसंस्कृतीबद्दलची त्यांची आस्था त्यातून दिसून येते. या अशा लेखनातून बौद्ध साहित्याचा मराठी वारकरी संत साहित्याशी आणि अगदी संत रामदासांच्या लेखनाशीही सांधा कसा जुळतो, हे त्यांनी दाखवलेच; पण गौतम बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, पालि साहित्यातील निसर्गवर्णन, त्या साहित्याची भाषाशैली अशा अंगांनीही त्यांनी कसदार चर्चा केली आहे. त्यांचे इंग्रजीतील ‘इण्डो-इटॅलिका’ हे पुस्तक भारत आणि इटली यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा आढावा घेणारे आहे. महाभारतापासून मॅझिनी-गॅरिबाल्डीपर्यंत आणि म. गांधी, वि. दा. सावरकर यांच्यापासून सोनिया गांधींपर्यंत इतिहास-वर्तमानाचे त्यात आलेले संदर्भ डॉ. धडफळे यांच्या सम्यक दृष्टीचे प्रत्यय देणारे आहेत. या संशोधनपर लेखनाबरोबरच त्यांनी संस्कृत, पालि आणि मराठीत ललितलेखनही केले. पालितील पहिल्या चित्रपटाचे संवादलेखनही त्यांनी केले होते. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर करण्याबरोबरच परदेशी विद्यापीठांमध्ये त्यांनी दिलेली व्याख्याने महत्त्वाची ठरली.

या अकादमिक कर्तृत्वाबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते सहा वर्षे मानद सचिव होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी भूषविले. बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. वैदिक संशोधन मंडळाचेही ते अध्यक्ष होते. कुठल्याही समाजाच्या बौद्धिक जीवनास त्या समाजातील संशोधक आणि त्या विषयातील त्यांची संस्थात्मक सक्रियता झळाळी मिळवून देत असतात. डॉ. धडफळे हे अशांपैकी एक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:03 am

Web Title: sanskrit and pali language practitioners dr m g dhadphale zws 70
Next Stories
1 अलेक्सी लिओनोव
2 डॉ. बर्नार्ड फिशर
3 दादू चौगुले
Just Now!
X