विसाव्या शतकात, दुसरे महायुद्ध संपता-संपता महाराष्ट्रीय महिला कमावत्या होऊ लागल्या. बंगाल महाराष्ट्राइतकाच सांस्कृतिकदृष्टय़ा प्रगत असला, तरी महिलांनी घराबाहेर पडण्याचे सामाजिक स्थित्यंतर तिथे उशिराच झाले.. बहुधा म्हणूनच, ‘पोष्टातील मुलगी’(१९५४) सारखा चित्रपट तिथे बनू शकला नाही! अशा वेळी, १९५० सालापासून विभाजित बंगालात- तत्कालीन ‘पूर्व पाकिस्ताना’त छायाचित्रणाचा छंद जपणाऱ्या आणि १९५६ पासून मासिके अथवा दैनिकांसाठी व्यावसायिक दर्जाचे छायाचित्रण करणाऱ्या सयीदा खानम यांचे स्थान विशेष! ‘बांगलादेशातील  पहिल्या महिला छायाचित्रकार’ ठरलेल्या सयीदा खानम, ‘जागतिक छायाचित्रण दिना’च्या एक दिवस आधी, १८ ऑगस्ट रोजी निवर्तल्या. बांगलादेश मुक्तिसंग्रामाची त्यांनी काढलेली सुमारे तीन हजार छायाचित्रे, हा आता ऐतिहासिक ठेवा ठरला आहे.

गोलम कासिम, अमानुल हक, मन्झूर आलम बेग, बिजॉन सरकार अशा तत्कालीन बांगलादेशी छायाचित्रकारांच्या तोडीस तोड काम सयीदा यांनी केले. त्यांचा जन्म १९३७ चा, पबना जिल्ह्यतला. घराणे सुशिक्षित. मोठी बहीण हमीदा खानम या पुढे अर्थतज्ज्ञ म्हणून नावाजल्या गेल्या. या हमीदा यांची एक मैत्रीण लुतफुन्नीसा चौधरी यांनी साधा कोडॅक कॅमेरा सयीदा यांना दिला. ‘कोलकात्यात मी पहिला फोटो काढला.. दोघा काबुलीवाल्यांचा!’ असे सयीदा आवर्जून सांगत. तेव्हा वय होते १३. पण रवीन्द्रसंगीत, नझरुलगीती, साहित्य यांप्रमाणेच दृश्यकलेतही रुची असणाऱ्या सयीदा यांनी पुढल्या पाच वर्षांत प्रगती केली. अमेरिकेत शिकायला गेलेल्या हमीदा यांनी ‘रोलीकॉर्ड’ हा त्या मानाने  व्यावसायिक कॅमेरा बहिणीसाठी आणला, तेव्हा तर सयीदा यांनी पुढल्याच वर्षी (१९५६) पाकिस्तान सरकारचा पुरस्कार मिळवला आणि जर्मनीतील कलोन येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागही!

ब्रिटनच्या राणीची ढाका-भेट (१९६१) ‘बेगम’ या महिला-दैनिकाच्या छायापत्रकार म्हणून त्यांनी अनुभवली. बांगला साहित्य व ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या सयीदा यांनी ढाका विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून नोकरी धरली; पण छायाचित्रणही आवड म्हणून सुरू ठेवले. सत्यजित राय, मदर तेरेसा यांच्यावर छायाचित्र-मालिका करण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी तिचे सोने केले. मात्र १९७१ दरम्यानचे (मुक्तिसंग्राम) त्यांचे चित्रण अजरामर ठरते. या संग्रामानंतर जखमींसाठी त्यांनी रुग्णालयात परिचारिकेचेही काम केले होते, हे विशेष. ‘इकुशे पदक’ हा बांगलादेशातील पद्मश्रीतुल्य सन्मान त्यांना मिळाला होता.