– डॉ. नागेश टेकाळे

घरांमध्ये पैसा येतो व तो टिकून राहतो या छानशा समजुतीमुळे त्याकाळी घरोघरी खिडकीत बाटलीमध्ये लावलेले मनी प्लॅन्ट दिसत असत. पैसे आले किंवा टिकले याबद्दल माहीत नाही, मात्र खिडकीमधील मनी प्लॅन्टमुळे प्रत्येक घरात मात्र आनंद ओसंडून वाहत असे. अंगणात तुळस, परसदारी अळू आणि घरामध्ये मनी प्लॅन्ट हे प्रत्येक घराचे वैशिष्ट्य होते. घरात-तेही उंबऱ्याच्या आत प्रवेश केलेले हे पहिले झाड असावे.

मनी प्लॅन्टला वनस्पतीशास्त्रात वेगवेगळ्या नावाने संबोधले जात असले तरी ती ‘पोथॉस’ या नावानेच ओळखली जाते. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. पाने मोठी, फिक्कट हिरवी, तजेलदार, हृदयाकृती, एक आड एक रचना असलेली, टोकास पानाची उमलणारी कळी आणि आकर्षक हिरव्या रंगाचे खोड हे या झाडाचे वर्णन. उभ्या बाटलीमध्ये स्वच्छ पाणी भरून या वेलींची लहान फांदी खालची एक दोन पाने काढून आत सोडली की दोन तीन वर्षे तिच्याकडे पाहावयाचीसुद्धा गरज नाही. झाड हळूहळू वाढते, वरच्या बाजूस छान पाने येतात आणि वेल वर चढू लागते. तिला थोडा आधार दिला की खिडकीची शोभा वाढते. खिडकीच्या दोन्ही बाजूस दोन बाटल्यांमध्ये मनी प्लॅन्ट लावले, तर एक वर्षांत खिडकीवर छान हिरवी कमान तयार करता येते. चैत्र गौरीच्या आरासामध्ये आंब्याच्या घोसाबरोबरच बाटलीमधील मनी प्लॅन्टची वेल उठून दिसते. मनी प्लॅन्ट हे अतिशय स्वच्छ झाड आहे, पाने आकर्षक, वाळून कचरा होण्याची भीती नाही, बाटलीमधील पाण्यात वाढत असल्याने मातीचा त्रास नाही, कुठेही खत नको, निगराणीचा खर्च नाही आणि कीडसुद्धा पडत नाही.

हेही वाचा – पावसाळ्यातही त्वचेला मॉईश्चरायझर हवंच! का? वाचा-

या वेलीची वाढ हळू असल्याने कापण्याचा त्रास नाही आणि हिरवी वाढच भरपूर असल्यामुळे फुलांचा प्रश्नच येत नाही. सोबत घरामध्ये भरपूर प्राणवायूची निर्मिती, शिवाय नजरेचे सुख हे वेगळेच. मात्र बाटलीमधील पाणी महिन्यातून एकदा तरी बदलावे आणि नंतर तिच्या तोंडाचा भाग व्यवस्थित बंद करावा, म्हणजे डेंग्यूची भीती राहात नाही. लहान मुलांपासून बाटलीस जपणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आकर्षक नक्षीच्या व विविध आकाराच्या बाटल्या वापरून मनी प्लॅन्टचे सौंदर्य अजूनही खुलवता येते. मनी प्लॅन्टच्या शाखांपासून शेकडो झाडे तयार करता येऊ शकतात. त्यांच्या विक्रीतून सातत्याने पैसा मिळू शकतो, म्हणून यास पैशाचे झाड असे नाव पडले असावे.

हेही वाचा – लिसा फ्रँचेट्टी…अमेरिकन नौदलाचं नेतृत्व जिच्या हाती‌!

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी घरोघरी दिसणारे हे झाड आता मात्र फारसे दिसत नाही. खिडक्यांना लागलेले काचेचे दरवाजे, त्यावर सोडलेले आकर्षक रंगीत पडदे या कृत्रिम सौंदर्यापुढे नैसर्गिक हिरवाईस कोण विचारणार? अनेक रोपवाटिकांमध्ये ही वेल उपलब्ध असते. कुंडीमध्ये लावलेलीसुद्धा आढळते. मात्र वास्तूच्या खिडकीमधून सध्या तरी ती अदृश्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(nstekale@rediffmail.com)