Ayodhya Ram Mandir : राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे. २२ जानेवारीला आयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे. या दिवसाची संपूर्ण जगाला उत्सुकता असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. या उत्सवासाठी अनेकांना निमंत्रित केले गेले आहे. यामध्ये राजकीय वर्तुळापासून बिझनेस तसेच कलाकारांचादेखील समावेश आहे. दरम्यान छत्तीसगडमधील कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या ८५ वर्षीय बिदुलाबाई देवार यांनाही राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत बोलावण्यात आले आहे. राम मंदिरासाठी स्वच्छता कर्मचारी बिदुलाबाई यांचं योगदान ऐकून तुम्हीही धन्य व्हाल.

४० रुपये कमाईतले २० रुपये दान केले

बिदुलाबाईंनी २०२१ मध्ये श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी २० रुपये दान केले होते. ही रक्कम छोटी असली तरी त्यामागची भावना खूप मोठी होती. खरंतर बिदुलाबाईंनी त्या दिवशी कचरा विकून ४० रुपये कमावले होते, त्यातील अर्धे पैसे त्यांनी दान केले.

बिदुलाबाई छत्तीसगडमधील धर्मनगरी राजीममध्ये राहतात, तिथे भगवान विष्णूचे मंदिर आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल सिंह राजपूत म्हणाले की, ते येथील निधी संकलन आणि अक्षत मोहिमेचे प्रमुख आहेत. कचरा वेचणाऱ्या बिदुला बाई यांनी २०२१ साली मंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या गटांना बोलावून त्यांच्या ४० रुपयांच्या रोजच्या कमाईतील अर्धा भाग दिला होता.

राम मंदिरात ‘तिचा’ खारीचा वाटा

नंतर त्यांनी आढावा बैठकीत बिदुलाबाईंचा हा अनुभव सांगितला तेव्हा राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना रामललाच्या दर्शनासाठी खास आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वर्मा सोमवारी दाखल झाले. प्रकृतीच्या कारणास्तव बिदुलाबाईंना २२ जानेवारीला नाही तर नंतर रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे.

हेही वाचा >> Ayodhya Ram Mandir : हजारो मृतदेहांचं शवविच्छेदन करणाऱ्या महिलेला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, जाणून घ्या कोण आहेत संतोषी दुर्गा?

कलाकारांनाही आमंत्रणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम मंदिर ट्रस्टने ३,००० व्हीआयपींसह ७,००० लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, सनी देओल, टायगर श्रॉफ, आयुष्मान खुराना, अजय देवगण, कंगना रणौत असे कलाकार आहेत ज्यांना राम मंदिराच्या अभिषेकासाठी निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि संजय लीला भन्साळी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. याबरोबरच ऐतिहासिक दिवसासाठी सुपरस्टार रजनीकांत यांच्याशिवाय प्रभास, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, यश आणि ऋषभ शेट्टी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.