UPSC Success Story: क्षेत्र कोणतंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अशातच अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कुटुंबाची जबाबदारी पार पाडत अनेकांना वेगळी वाटचाल करावी लागते. जबाबदारीमुळं काहींची स्वप्नं स्वप्नच राहतात, तर काही स्वप्नांचा पाठलाग सोडत नाहीत. तर अनेकवेळा मुलं जबाबदारीमुळे आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळ्या क्षेत्रात काम करतात. असं असलं तरी कधीकाळी पाहिलेलं स्वप्न मन विसरू देत नाही. अशाच एका तरुणीनं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि परिस्थितीवर मात करत तिचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. आज आपण आयएएस अधिकारी अक्षिता गुप्ता यांच्याबद्दल बोलणार आहोत.
हॉस्पिटलमध्ये १४ तास काम आणि ब्रेकमध्ये यूपीएससीची तयारी
एकेकाळी १४ तास हॉस्पिटलमध्ये काम आणि उरलेल्या वेळात यूपीएससीची तयारी करून त्यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे लाखो भारतीयांचे स्वप्न असते, परंतु यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे नाही; कारण ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी संपूर्ण भारतातून लाखो उमेदवार यूपीएससीची परीक्षा देतात. मात्र, काही मोजकेच यात उत्तीर्ण होतात. आयएएस अक्षिता गुप्ता यांनीही यामध्ये बाजी मारत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पण, त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण
डॉ. अक्षिता गुप्ता चंदिगडच्या रहिवासी असून त्यांचे वडील पवन गुप्ता हे एका विद्यालयात प्राचार्य आहेत, तर आयएएस अधिकारी डॉ. अक्षिता गुप्ता यांची आई मीना गुप्ता या सरकारी शाळेत गणिताच्या शिक्षिका आहेत. आयएएस अधिकारी अक्षिता जेव्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या, तेव्हा त्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होत्या. यादरम्यान त्या १४ तास हॉस्पिटलमध्ये काम करायच्या, तर ब्रेकमध्ये यूपीएससीचा अभ्यास करायच्या. अशारितीनं डॉ. अक्षिता यांनी २०२० मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया ६९ वा रँक मिळवला.
हेही वाचा >> मातृत्वाची ताकद! नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आणि आईचा VIDEO का होतोय व्हायरल? एकदा पाहाच
‘त्या’ एका क्षणानं बदललं आयुष्य
अक्षिता गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी एकदा माझी यूपीएससी अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकातली सर्व पानं फाडली. पुस्तके फाडणं माझ्यासाठी वेदनादायी होतं; मात्र नंतर मी तीच सर्व पानं घेऊन त्याचे नोट्स तयार केले. त्यावेळी मी त्याच नोट्समधून अभ्सास केला आणि ‘त्या’ एका क्षणानं माझं आयुष्य बदललं.