डॉ. मेधा ओक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थायरॉइड, त्याचे प्रकार, लक्षणे, उपाय याबरोबरच आपण मागील तीन लेखांत गर्भवती आणि बालकांमधील थायरॉइड यांचीही माहिती घेतली. या लेखात आपण थायरॉइड आणि सहव्याधी याबाबत माहिती घेऊ.

थायरॉइडवर उपचार करताना रुग्णाचे वय व त्याच्या इतर व्याधी लक्षात घेणे खूपच महत्त्वाचे असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, नैराश्य (डिप्रेशन) या सर्वांचा थायरॉइडशी खूप जवळचा संबंध आहे. ते एकमेकांवर परिणाम करतात.
आणखी वाचा : गर्भवती आणि बालकांमधील थायरॉइडची समस्या 

ज्येष्ठांमधील समस्या

रुग्णाचे वय ६० च्या पुढे असेल तर TSH हार्मोनची वाढ ही संरक्षणात्मक असते. म्हणजेच TSH जर थोडेसेच वाढलेले म्हणजे ४ ते ९ microIU/L इतकीच असेल आणि पुढील चाचण्यातही ते वाढत नसेल अथवा हायपोथायराॅइडची काहीही लक्षणे नसतील तर उपचाराची गरज नसते. तसेच वय वाढते तसे क्वचित TSH पण वाढू शकते. गोळी चालू केली तर, अंजायना (छातीत दुखणे) किंवा हृदयविकार लक्षात घेऊन अत्यंत कमी मात्रा देऊन उपचार सुरू करतात. ईसीजी व ईको टेस्ट करून मग गरज असेल तरच डोस (मात्रा) वाढवला जातो. कारण थायरॉइड हॉर्मोन हे मेटाबोलिजम म्हणजेच चयापचय वाढवते. त्यामुळे एकदम जास्त डोस दिला तर हृदयाची गती जलद होते आणि ते रुग्णाच्या हृदयाला झेपत नाही. त्यामुळे छातीत दुखण्यासारखा त्रास उद्भवू शकतो. So start slow go slow हे महत्त्वाचे.

मधुमेह आणि थायरॉइड

टाईप वन मधुमेह आणि थायरॉइड दोन्हींमध्ये साम्य आहे. दोन्ही अंतस्त्रावी ग्रंथींमध्ये बिघाड दर्शवतात. इन्सुलिन आणि थायरॉइड दोन्ही हॉर्मोन्स आहेत. इन्सुलिन स्वादुपिंडातून तयार होते व रक्तातील शर्करा नियंत्रणास मदत करते. थायरॉइडवरील उपचार योग्य नसतील तर रक्त शर्करा नियंत्रणात राहत नाही. दहा टक्के टाईप वन मधुमेहींमध्ये हाशीमोटोज् थायरॉइडायटिस् (Hashimoto’s Thyroiditis) हा विकार आढळतो. टाईप वन मधुमेह असणाऱ्या २५ टक्के स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर थायरॉइडचा विकार होऊ शकतो. म्हणून सर्व टाईप वन मधुमेही रुग्णांचे T3, T4, TSH ची चाचणी करणे खूप महत्त्वाचे ठरते. तसेच या रुग्णांमध्ये इन्सुलिन आणि थायरॉइड दोन्हीसाठी ऑटोअॅण्टिबाॅडीज दिसतात. थायरॉइडवर उपचार न केल्यास रक्तशर्करा नियंत्रित राहणे मुश्कील होते.

हायपर आणि हायपो थायरॉइड दोन्हीचा परिणाम मधुमेहावर होतो. हायपोमध्ये HbA1c पण जास्त दिसते. T3 चे T4 मध्ये रूपांतर होत नाही. मधुमेहामध्ये T3 ची पातळी खूपच कमी होते. तसेच टाईप २ मधुमेहामध्ये गाॅयटर (गळ्यावरील गाठी) पण जास्त प्रमाणात दिसते. इन्सुलिनला प्रतिकूलता वाढते आणि थायरॉइड हार्मोन इन्सुलिनच्या कृतीत अडथळे निर्माण करत इन्सुलिनला योग्य कार्य करू देत नाही. त्यामुळे रक्त शर्करा वाढते.
आणखी वाचा : महिलांमधील हायपरथायरॉइडीझम आहे तरी काय?

थायराॅइड हार्मोन्स कर्बोदकांच्या पचनासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे हायपोथायरॉइडमध्ये रक्तातील शर्करेचा निचरा नीट होत नाही. तसेच शरीरात बाहेरून इन्सुलिन दिल्यास इन्सुलिनचा ही निचरा होत नाही. त्यामुळे रक्तातील साखर प्रमाणाच्या बाहेर कमी होऊ शकते. तेव्हा बाहेरून देण्यात येणाऱ्या इन्सुलिनचा डोस कमी करावा लागतो. थायरॉइडवर उपचार केल्याने मधुमेह नियंत्रणात येण्यास मोठी मदत होते.

हायपर थायराॅइडमध्ये वजन कमी होते, छातीत धडधडते, खूप घाम येतो, अस्थिर मनस्थिती होते, थरथर जाणवते, खूप भूक लागते आणि थकवा येतो. अशी सर्वच लक्षणे मधुमेह अनियंत्रित असल्यास ही दिसतात. त्यामुळे निदानात गोंधळ उडू शकतो. प्रत्येक मधुमेही रुग्णाने वर्षातून दोनदा तरी थायरॉइडची चाचणी करावी. जेणे करून त्वरित निदान आणि उपचार होतील. हायपो थायरॉइड असल्यास सुरू असलेली औषधे कायम घेणे हाच उपाय आहे. तसेच थायरॉइड सामान्य ठेवणे केव्हाही फायदेशीर.

नैराश्य, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड

नैराश्य किंवा डिप्रेशन व हाय कोलेस्ट्रॉल म्हणजे Dyslipidemia, मध्येसुद्धा मेटाबोलिजम म्हणजेच चयापचय खूप संथ असते. त्यातच जर जोडीला थायरॉइड पण सदोष असल्यास अधिक दुष्परिणाम दिसतात.

नैराश्य आणि हायपोथायरॉइडमधे बरीच लक्षणे सारखी असतात. उदाहरणार्थ – भूक न लागणे, उदास वाटणे, खूप झोप येणे, वजन वाढणे, उत्साह नसणे इत्यादी… त्यामुळे रोगाचे निदान अवघड होते आणि दिशाभूल होऊ शकते. सर्वच उलाढाल संथ झाल्यामुळे कोलेस्टेरॉलचा निचरा होत नाही. पण थायरॉइड सामान्य झाले की बऱ्याच अंशी कोलेस्ट्रॉल सामान्य होते. तसेच थायरॉइड उपचारबरोबर नैराश्यावरील उपचार जोडीला केले तर चांगला फरक दिसून येतो. क्वचित नैराश्यासाठी देण्यात येणारे लिथियम हे औषध हायपोथायराॅइड स्थिती निर्माण करते. तेव्हा सर्व माहिती उपचार सुरू करण्याआधी घेणे अत्यंत महत्त्वाचे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thyroid disease cause and effect hypothyroidism comorbidity nrp
First published on: 24-08-2022 at 06:00 IST