अगदी ताजी गोष्ट. पॅरिस फॅशन वीक २०२३. अतिप्रसिद्ध मॉडेल कायली जेन्नर हिनं चक्क एक भलंमोठं ‘लाईफसाईज’ सिंहाचं डोकं जोडलेला काळा गाऊन घालून प्रवेश केला आणि ती डिझायनर डॅनिएल रोझबेरी यांच्या फॅशन शोमध्ये ‘फ्रंट रो’मध्ये अगदी दिमाखानं विराजमान झाली! Schiaparelli या ब्रँडसाठी तयार केलेलं रोझबेरी यांचं ‘इनफर्नो कुट्योर कलेक्शन’ रॅम्पवर सादर होऊ लागलं. कायलीचा ‘लायन हेड ड्रेस’ याच कलेक्शनमधला. हे कलेक्शन थांबलं नाही. एकीच्या गाऊनवर हिमबिबट्याचं डोकं जोडलेलं, तर एकीच्या गाऊनवर काळ्याकुट्ट लांडग्याचं डोकं… फॅशन या गहन विषयात अनभिज्ञ असलेला एखादा झीटच येऊन पडावा असा तो प्रकार होता!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : महिला वैमानिकाची सर्वाधिक टक्केवारी भारतातच का?

कायलीचे हे फोटो ‘इन्स्टा’वर पडले आणि समस्त ‘इस्टा कम्युनिटी’ या कलेक्शनवर खवळली! प्राणीप्रेमी मंडळी जरा जास्तच खवळली. आणि ही मुंडकी खऱ्या प्राण्यांची आहेत की काय, या शंकेनं नेटकऱ्यांच्या कमेंटस् मध्ये गोंधळ माजला! अर्थातच गाऊन्सवरची ही तोंडं खऱ्या प्राण्यांची वगैरे नव्हती. खोटी खोटीच होती. फॉक्स (faux) फर पासून बनवलेली. मात्र ती भलतीच जिवंत भासत होती. ती खरी असती तर काय गदारोळ झाला असता याचा नुसता विचार करून पहा!

आणखी वाचा : नातेसंबंध: बॉयफ्रेण्डनं ‘डीच’ केलं तर?

कायली जेन्नर ही प्रचंड लोकप्रिय सेलिब्रिटी असल्यानं तिचे ‘लायन हेड ड्रेस’ घातलेले फोटो ‘व्हायरल’ झाले. प्राणीप्रेमी मंडळींनी असा सूर धरला, की हा जंगली प्राण्यांच्या शिकारीला पाठिंबा देण्याचा प्रकार आहे. (प्राणीप्रेमींमधल्या एका गटानं मात्र कलेक्शनचं कौतुक केलं.) काही लोक म्हणू लागले, की फॅशनच्या नावाखाली हल्ली काहीही खपवतात बुवा! काही लोक आणखी गंभीर झाले आणि ‘ही अतिश्रीमंत मंडळी वास्तवातल्या जगापेक्षा कशी कोसो दूर असतात’ वगैरे बोलू लागले. अशा कमेंटस् नी संबंधित पोस्टस् वरची ‘ॲक्टिव्हिटी’ वाढू लागली. काहींनी लगेच सिंह आपल्या गळ्यात कायलीच्या मुंडक्याचं पदक घातलेलं लॉकेट घालून मजेत बसलाय, असे मीम्स तयार करून फिरवले. आंतरराष्ट्रीय फॅशन वीक्सच्या रॅम्पवर दाखवली जाणारी कलेक्शन्स कशी अचाट असतात याची आपणा साऱ्यांना कल्पना आहे. त्यातला एकही कपडा सामान्य माणसाला घालण्यासारखा नसणार, हेही आपण मान्य केलेलं असतं. तरीही एकंदरीत ‘ही कसली विचित्र फॅशन!’ अशीच त्या दिवशी समाजमाध्यमांवर दिसलेली भावना होती.

आणखी वाचा : U19 Women T20 WC: कर्करोगाने पतीला तर सर्पदंशाने मुलाला गमावले; जगाने दुर्लक्षित केलेल्या आईच्या लेकीने टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन 

या कलेक्शनचे डिझायनर रोझबेरी यांचं म्हणणं असं, की हे कलेक्शन कवी डांटेच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’ या महाकवितेतल्या ‘इनफर्नो’ या भागावरून प्रेरित आहे. बिबट्या, सिंह आणि लांडगा (खरंतर she-wolf – लांडगी म्हणावं का?) ही म्हणे प्रखर कामभावना (लस्ट), अभिमान (प्राईड) आणि भौतिक गोष्टींचा मोह (avarice) याची प्रतीकं आहेत. रोज इन्स्टाग्रामवरची फॅशन बघून बघून डोळे दिपून जाणाऱ्या आपल्यासारख्यांनाही हा ‘गर्भित’ अर्थ कदापी ओळखता आला असता का?…

आणखी वाचा : नितळ त्वचेसाठी आवडत्या बटाट्याचा ‘असा’ करा वापर

फॅशनमधली मजा (की गोम?) हीच आहे नाही का?… डिझायनरनी बनवलेलं कलेक्शन आपल्या समोर असतं. त्यात डिझायनरला अभिप्रेत अर्थही त्यानं सांगितलेला असतो. पण तो अर्थ कलेक्शनमध्ये स्पष्ट दिसेल अशी अपेक्षा मात्र बाळगायची नाही! कुणाला ते अर्थहीन वाटेल, तर कुणाला त्यात आणखी खोल अर्थछटा दिसतील. म्हणजे या क्षेत्रातल्या पुष्कळ गोष्टी मानण्यावर असतात का? तुमचं या ‘लायन हेड ड्रेस’विषयी काय मत? एक मात्र आहे, रोजच्या धबडग्यात ऑफिस गाठताना किंवा घरी आल्यावर ‘अपरिहार्य’ कामांना जुंपताना स्वत:चं ‘हेड’ गरम न होऊ देताना जो कस लागतो, तोच आपणा ‘चतुरां’साठी खरा!
lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weird in fashion trend kylie jenner gown with lion head dress vp
First published on: 01-02-2023 at 13:27 IST